भारताच्या अर्थव्यवस्थेची कामगिरी सुमारच आहे असं आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (International Monetary Fund) म्हटलं आहे. भारताचा जीडीपी दर आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच ५ टक्क्यांवर घसरला. हा गेल्या सहा वर्षातला निचांक आहे त्यावरुन आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी सुमार असल्याचं म्हटलं आहे. मोदी सरकारला हा दणका आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला भारतीय अर्थव्यवस्थेच्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी सुमार आहे असंही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे.

दरम्यान जीडीपीचा दर जेव्हा समोर आला त्याचवेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही मोदी सरकारवर टीका केली. मानवनिर्मित संकटांमुळेच भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. या सगळ्या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. या संकटातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी राजकीय वैर बाजूला ठेवून विचारी माणसांपर्यंत सरकारने जावे असाही सल्ला त्यांनी दिला होता. देशातील तरुण, शेतकरी, शेतमजूर, उद्योजक आणि उपेक्षित प्रवर्ग चांगल्या जीवनमानासाठी पात्र आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला लागलेली घसरण परवडणारी नाही असंही सिंग यांनी म्हटलं होतं.

आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंही मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेनं सुमार कामगिरी केल्याचं म्हटलं आहे. जीडीपीचा दर २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ७ टक्के किंवा त्यापेक्षा काहीसा जास्त असेल अशी आमची अपेक्षा होती. मात्र तसं घडलेलं नाही. जीडीपी दर पाच टक्क्यांवर घसरला आहे. असं असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था जगातली वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे असंही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

सध्या भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीच चीनच्याही पुढे आहे असंही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला ही अपेक्षा आहे की भविष्यात ही सुमार कामगिरी सुधारेल. आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती होईल अशी अपेक्षा करतो आणि त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत असं IMF च्या प्रवक्त्या गेरी राईस यांनी म्हटलं आहे.