भारताचे औद्योगिक उत्पादन सलग दुसऱ्या महिन्यात घटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्ट महिन्यात यात ०.७ टक्केची घसरण झाली आहे. सरकारी अहवालानुसार खाण आणि उत्पादकतेत घट झाल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात खाण क्षेत्रात ५.६ टक्क्यांची तर उत्पादन क्षेत्रात ०.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. भांडवली वस्तू उत्पादन २२.२ टक्केपर्यंत मर्यादित राहिले. वर्ष २०१५ मध्ये ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत यंदा ग्राहक वस्तू उत्पादनात १.१ टक्क्यांची वाढ दिसून आली. गतवर्षी सरकारने जीडीपी काढण्याच्या पद्धतीत बदल केला. तेव्हापासून औद्योगिक उत्पादनात निराशजनक आकडे दिसून येत आहे.
देशात बेरोजगारीतही वाढ होत असल्याचे दिसत आहे. श्रम आयोगाच्या अहवालानुसार देशातील बेरोजगारीचा दर २०१५-१६ मध्ये पाच टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. गत पाच वर्षांतील हा सर्वोच्च स्तर आहे. महिलांमधील बेरोजगारीतही वाढ झाली असून तो ८.७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर पुरूषांच्या संदर्भात तो ४.३ टक्के इतका राहिला आहे. ही आकडेवारी भाजपशासित सरकारसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. विशेष म्हणजे केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यांपासून ‘मेक इन इंडिया’वर भर दिला आहे.
सरकार मात्र विकासदरात वाढ होण्याची अपेक्षा करत आहे. चांगला मॉन्सून, जलद सुधारणा आणि केंद्र सरकारची निर्णयक्षमता यामुळे भारताचा आर्थिक दर यंदाच्या तिमाहीत आठ टक्क्यांच्यावर पोहोचेल असा विश्वास नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी व्यक्त केला आहे.