आसाममधील बेकायदा स्थलांतरित शोधून काढण्याची राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी मोहीम (एनआरसी) हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, असे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी मंगळवारी येथे सांगितले. बांगलादेशचे समपदस्थ ए. के.अब्दुल मोमीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चेनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जयशंकर हे सध्या दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यासाठी ढाक्यात आले आहेत. मंत्रिपदाची सूत्रे घेतल्यानंतर त्यांचा हा पहिला बांगलादेश दौरा आहे. मोमीन यांच्या समेवत संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी म्हणजे एनआरसी हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. एनआरसी मोहिमेत बेकायदा बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेतला जात असून विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ही घुसखोरी सुरू होती. १९५१ मध्ये पहिली नागरिकत्व नोंदणी करण्यात आली होती. ३० जुलै २०१८ रोजी अलीकडच्या नागरिकत्व नोंदणीचा पहिला मसुदा जाहीर झाला तेव्हा ४०.७ लाख लोक वगळले गेले होते. एकूण ३.२९ अर्जापैकी २.९ कोटी लोकांची नावे एनआरसीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

जयशंकर यांनी सांगितले की, तिस्ता पाणी करारास भारत वचनबद्ध आहे.

मोमीन यांनी सांगितले की, जयशंकर यांच्या बरोबरची भेट ही चांगली झाली. सर्वच प्रश्नांवर जवळपास मतैक्य झाले आहे. मात्र चर्चेत नेमके कुठले विषय होते हे त्यांनी सांगितले नाही.

जयशंकर यांनी मंगळवारी बांगलादेश भेटीत बांगलादेशचे संस्थापक बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांना धनमोंडी येथील बंगबंधू स्मृती संग्रहालयात जाऊन श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान शेख हसीना यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.