भारतातील श्रीमंत व्यक्तींसंदर्भातील एक धक्कादायक ट्रेण्ड गुंतवणूक आणि वित्तीय क्षेत्रातील कंपनी असणाऱ्या मॉर्गन स्टेनलीच्या एका अहवालामधून समोर आला आहे. मॉर्गन स्टेनलीने सादर केलेल्या एका अहवालामधील आकडेवारीनुसार देशातील २३ हजार श्रीमंत व्यक्तींनी आपल्या भारतीय नागरिकत्व रद्द करुन परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे. त्यापैकी सात हजार जण तर २०१७ साली देश सोडून दुसऱ्या देशात कायमचे स्थायिक झाले आहेत.

अशाप्रकारे श्रीमंत व्यक्तींनी देश सोडून जाण्याने भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतात यासंदर्भातील अभ्यास करण्याच्या दृष्टीने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने (सीबीडीटी) (केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड) मार्च महिन्यात पाच सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. सीबीडीटीच्या इंटर्नल मेमोमधील माहितीनुसार मागील काही काळापासून देशातील श्रीमंत लोक देशाबाहेर स्थायिक प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. अशाप्रकारे श्रीमंत लोकांनी देशाबाहेर गेल्याने कर संचलनावर मोठा परिणाम होऊ शकतो. देशाबाहेर स्थायिक झालेले श्रीमंत लोक स्वत:ला अनिवासी भारतीय दाखवून करसवलती घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हिरानंदानींने भारताचे नागरिकत्व सोडले…

देश सोडून जाणाऱ्या श्रीमंत भारतीयांच्या यादीमध्ये नुकतेच एका मोठ्या नावाची भर पडली आहे. हे नाव म्हणजे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आणि हिरानंदानी समुहाचे संस्थापक सुरेंद्र हिरानंदानी. ६३ वर्षीय सुरेंद्र हिरानंदानी यांनी भारतीय पासपोर्ट सरकारकडे परत केला असून त्यांनी सायप्रस या देशाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. या संदर्भात बोलताना सुरेंद्र हिरानंदानी यांनी भारतीय पासपोर्टवर वर्क व्हिजा मिळणे किचकट असते. मला भारतीय कर प्रणालीशी किंवा इतर कोणतीही आर्थिक अडचण नाहीय. माझा मुलगा हर्ष हा भारतीय नागरिकच असून तोच सध्या आमच्या कंपनीचा भारतातील कारभार पाहतो अशी माहिती हिरानंदानी यांनी ‘मुंबई मीरर’शी बोलताना दिली. इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजेच व्यापारिकरणासाठी अनुकूल परिस्थिती असणाऱ्या देशांच्या यादीत भारत १००व्या स्थानी आहे तर सायप्रस याच यादीमध्ये ५३व्या स्थानी आहे.

बांधकाम व्यवसायामध्ये केवळ १० टक्के नफा मिळतो असे हिरानंदानी यांनी सांगितले मला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करण्याची संधी मिळाल्यास बांधकाम क्षेत्रातील परवानग्यांसाठीची सध्याची पद्धत बदलून ती अधिक सोयीस्कर आणि सोप्पी करण्याची मागणी करेल असे हिरानंदानी म्हणाले. जगातिक बँकेने तयार केलेल्या यादीनुसार बांधकाम क्षेत्रातील सोयिस्कर कार्यपद्धतीच्या १८९ देशांच्या यादीमध्ये भारताचे स्थान १८१वे आहे.

देशातील १०० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये हिरानंदानी यांचा समावेश आहे. मात्र अशाप्रकारे भारत सोडून जाणारे हिरानंदानी हे एकमेव श्रीमंत व्यक्ती नाही. साडेसहा कोटीहून अधिक संपत्ती असणाऱ्या हजारो भारतीयांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करुन युरोपीय किंवा कॅरेबियन देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे.