पाकिस्तान आणि बांगलादेशाच्या तुलनेत भारतातील अल्पसंख्याकाची स्थिती खूपच चांगली असल्याचे मत वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांनी व्यक्त केले आहे. मातृभूमी बांगलादेशातून निर्वासित झालेल्या तस्लिमा यांना भारत हे त्यांना आपल्या घरासारखेच वाटते. इंदूर येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या नसरीन यांनी माध्यमांशी संवाद साधताना भारतातील अल्पसंख्याकाबद्दल आपले मत मांडले.

तस्लिमा म्हणाल्या, बांगलादेशात हिंदू आणि बौद्धांवर खूप अत्याचार होतात. मी पाकिस्तानला कधी गेलेले नाही. पण तिथे धार्मिक अल्पसंख्याकाचे बळजबरीने धर्मांतरण आणि त्यांच्यावर अन्याय केले जात असल्याचे वृत्तपत्रात वाचलेले आहे. या दोन्ही देशांच्या तुलनेत भारतात अल्पसंख्याकाची स्थिती खूपच चांगली आहे. भारताचे संविधान सर्वांसाठी सारखेच आहे. भारतातील अल्पसंख्याकासमोरील सर्वच संकटे संपली हे मी म्हणणार नाही, हे त्यांनी आवर्जुन सांगितले.

मी युरोपची नागरिक आहे. पण भारतात मला घरी आल्यासारखे वाटते. मी भारत सरकारची आभारी आहे, कारण त्यांनी मला भारतात राहण्याची परवानगी दिली. मला भारतीय समाजासाठी काम करायची इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले. तस्लिमा यांनी भारतीय कायदा-सुव्यवस्थेचेही कौतुक केले. एका ऑनलाइन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखामुळे तस्लिमा यांच्याविरोधात पुन्हा निदर्शने होताना दिसत आहे.