News Flash

रशिया सोबतच्या ‘या’ खरेदी व्यवहारामुळे अमेरिका भारतावर लादू शकते निर्बंध

रिपोर्ट्मधून दिला इशारा....

भारत रशियाकडून S-400 एअर डिफेन्स सिस्टिम विकत घेणार आहे. अब्जावधी डॉलर्सचा हा खरेदी करार आहे. या करारामुळे अमेरिका भारतावर निर्बंध लादू शकते. अमेरिकन काँग्रेशनल रिपोर्टमधून हा इशारा देण्यात आला आहे.
“भारत टेक्नोलॉजी शेअरींग आणि सह उत्पादनासाठी उत्सुक आहे. भारताच्या संरक्षण ऑफसेट धोरणात सुधारणा करण्याची तसेच संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणूकीची मर्यादा वाढवण्याची अमेरिकेने विनंती केली आहे” असे काँग्रेशनल रिसर्च सर्व्हीसच्या रिपोर्ट्मध्ये म्हटले आहे. CRS हा अमेरिकन काँग्रेसचा स्वतंत्र संशोधन विभाग आहे.

भारताने रशिया बरोबर S-400 एअर डिफेन्स सिस्टिम खरेदीचा करार केला आहे. अमेरिकेच्या कॅटसा कायद्यातंर्गत भारतावर निर्बंध लादले जाऊ शकतात असा इशारा या अहवालातून देण्यात आला आहे. अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांसाठी हा अहवाल बनवला जातो.

CRS रिपोर्ट् हा अमेरिकन काँग्रेसचा अधिकृत रिपोर्ट् नाहीय. त्यात अमेरिकन काँग्रेस सदस्यांचे विचार देखील मांडण्यात आलेले नाहीत. स्वतंत्र तज्ज्ञांकडून काँग्रेसच्या सदस्यांसाठी हा अहवाद तयार केला जातो.

S-400 एअर डिफेन्स सिस्टिम काय आहे? भारताता त्याची आवश्यकता का आहे?

S-400 ही जमिनीवरुन हवेत क्षेपणास्त्र डागणारी रशियन प्रणाली आहे. ही दीर्घ पल्ल्याची सर्वात धोकादायक क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. अमेरिकेने विकसित केलेल्या ‘थाड’ क्षेपणास्त्र प्रणालीपेक्षाही ही अधिक घातक असल्याचे म्हटले जाते.

कुठल्याही हवाई हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी S-400 क्षेपणास्त्र प्रणाली सर्वात उपयुक्त आहे. शत्रूचे फायटर विमान असो किंवा मानवरहित विमान, बॅलेस्टिक किंवा क्रूझ मिसाइल हवेतच नष्ट करण्याची या सिस्टिमची क्षमता आहे. ४०० किलोमीटरच्या रेंजमधील व ३० किलोमीटर उंचीवरील शत्रूचे अस्त्र हवेतच नष्ट करता येईल.

हवाई हल्ल्याच्यावेळी एकाचवेळी १०० लक्ष्य शोधून एकाचवेळी सहा लक्ष्यांचा वेध घेण्याची या सिस्टिमची क्षमता आहे. मागच्यावर्षी आपल्याकडे S-400 प्रणाली असती, तर पाकिस्तानने २६ फेब्रुवारीला भारताच्या हवाई हद्दीत घुसण्याचे धाडस केले नसते.

S-400 ही रशियाची चौथ्या पिढीची क्षेपणास्त्र सिस्टिम आहे. S-200, S-300 ची S-400 पुढची आवृत्ती आहे. या सिस्टिमची अमेरिकेच्या पॅट्रीयॉट सिस्टिम बरोबर तुलना होऊ शकते.

S-400 मध्ये अत्याधुनिक रडार यंत्रणा असून ते स्वयंचलित पद्धतीने लक्ष्याचा माग काढू शकते. विमान विरोधी मिसाइल सिस्टिम, लाँचर्स, कमांड आणि कंट्रोल सेंटर आहे. तीन पद्धतीची क्षेपणास्त्र डागून सुरक्षा कवच बनवण्याची या सिस्टिमची क्षमता आहे.

रशियाच्या आधीच्या एअर डिफेन्स सिस्टिमपेक्षा S-400 दुप्पट प्रभावी आहे तसेच पाच मिनिटात ही प्रणाली तैनात करता येऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 3:36 pm

Web Title: indias missile deal with russia may trigger us sanctions dmp 82
Next Stories
1 करोनानंतर बर्ड फ्लूचं संकट : केरळने केली राज्यस्तरीय आपत्तीची घोषणा; मध्य प्रदेश, राजस्थानमध्येही सतर्कतेचा इशारा
2 मोदी सरकारच्या अहंकाराने ६० पेक्षा अधिक शेतकर्‍यांचा जीव घेतला – राहुल गांधी
3 बलात्कार करुन खून केल्याच्या आरोपामुळे ८ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर निर्दोष मुक्तता; सरकार देणार नोकरी
Just Now!
X