भारतीय रेल्वेला आतापर्यंतचं सर्वात ताकदवान इलेक्ट्रीक इंजिन मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारताच्या पहिल्या ‘इलेक्ट्रीक हाय-स्पीड लोकोमोटिव’ला हिरवा झेंडा दाखवतील. चंपारण सत्याग्रहाला १०० वर्ष झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आज बिहारमध्ये आहेत. बिहारच्या माधेपूरा येथील रेल्वे फॅक्टरीमध्ये फ्रान्सच्या एल्सटॉम या कंपनीने या लोकोमोटिव इलेक्ट्रीक इंजिनची निर्मीती केली आहे.

12000 हॉर्सपावर इतकी या लोकोमोटिवची क्षमता असून त्यामुळे 120 किलोमीटर प्रतितास एवढा रेल्वेचा वेग असणार आहे. 6000 टन वजन खेचण्याची क्षमता या लोकोमोटिवमध्ये आहे. अशाप्रकारचं लोकोमोटिव इंजिन असणा-या पाच देशांमध्ये भारताचा समावेश होईल. भारताशिवाय रशिया, चीन, जर्मनी आणि स्विडनमध्ये आधीपासून या इंजिनचा वापर होतो.

पुढील ११ वर्षांमध्ये बनवणार ८०० इंजिन –
मेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत एल्सटॉम कंपनी पुढील ११ वर्षांमध्ये अशाप्रकारचे ८०० इंजिन बनवणार असून त्यावर २० हजार कोटींहून जास्त खर्च होणार आहे. प्रत्येक इलेक्ट्रीक लोकोमोटिव इंजिनला बनवण्यासाठी २५ कोटी रूपयांचा खर्च येण्याचा अंदाज आहे.
हे लोकोमोटिव अत्यंत सुरक्षित असून, पर्यावरणाचा आणि भारतीय परिस्थितीचा विचार करुन या लोकोमोटिवची निर्मीती करण्यात आली आहे. अत्यंत थंड किंवा गरम वातावरणातही हे लोकोमोटिव काम करण्यास सक्षम असल्याचं सागितलं जात आहे.