करोना विषाणूच्या महासाथीशी लढण्यासाठी एकत्र येण्याचा निर्धार सार्क देशांनी रविवारी केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘आणीबाणी निधी’चा प्रस्ताव सार्क देशांपुढे मांडला आणि या निधीत भारत एक कोटी डॉलर्सचे योगदान देईल, अशी घोषणा केली.

करोना आपत्तीशी स्वतंत्रपणे न लढता सार्क देशांनी एकत्र यावे, असे आवाहन मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. घाबरू नका, सज्ज राहा, गोंधळ नको, सहकार्य करा, असे आवाहन मोदी यांनी केले.

सार्क देशांच्या प्रमुखांच्या या विशेष संवादात मोदी यांच्याव्यतिरिक्त श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्ष, मालदिवचे अध्यक्ष इब्राहिम मोहंमद सोली, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, भूतानचे दूत लोटय तेशरिंग, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी आणि पाकिस्तानचे आरोग्यमंत्री जफर मिर्झा या परिषदेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले.

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या बहुतेक सर्व सूचनांचे सार्क देशांच्या प्रमुखांनी स्वागत केले आणि सहकार्याची ग्वाही दिली.

आम्ही डॉक्टर आणि तज्ज्ञांचा समावेश असलेले आणि करोना चाचणीच्या उपकरणांनी सुसज्ज असलेले ‘शीघ्र प्रतिसाद पथक’ स्थापन करीत असल्याचे मोदी यांनी सांगितले.

सार्क देशांनी साथरोगांच्या नियंत्रणासाठी एक सामायिक संशोधन संस्था स्थापन करावी, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद त्यासाठी मदत करू शकते, अशी सूचना मोदी यांनी यावेळी केली.

पाकिस्तानकडून काश्मीरचा मुद्दा उपस्थित  

सार्क देशांच्या प्रमुखांच्या या परिषदेचा वापर पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील र्निबधांकडे लक्ष वेधण्यासाठी केला. करोना फैलावाच्या पाश्र्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील निर्बंध त्वरित शिथिल करावेत, अशी सूचना पाकिस्तानचे आरोग्यमंत्री जफर मिर्झा यांनी केली. परंतु मोदी यांनी जम्मू-काश्मीर करोनाशी लढण्यासाठी एकवटले आहे, असा स्पष्ट संदेश दिला. मिर्झा यांनी करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी चीनने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि चीनकडून सार्क देशांनी धडा घ्यावा, असे आवाहन केले.