करोना विषाणू हे ‘अभूतपूर्व आव्हान’ असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत या महासाथीविरुद्ध सुनियोजित लढा देत आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सांगितले. करोनावर लस शोधली जाईपर्यंत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले.

करोना विषाणू हे आपल्यासाठी आणि संपूर्ण मानवजातीसाठी अभूतपूर्व आव्हान आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण त्याच्या विरोधात सुनियोजित रीतीने लढत असून साऱ्या जगाने आपल्या प्रयत्नांना मान्यता दिली आहे, असे गृहमंत्री म्हणाले.

गांधीनगर येथून लोकसभेचे सदस्य असलेले शहा यांनी त्यांच्या मतदारसंघातील १२४ कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे दूरसंवादाद्वारे भूमिपूजन केले. उद्यानांचे नूतनीकरण, गांधीनगर शहराच्या अंतर्भागातील रस्त्यांचे रुंदीकरण, दोन शाळांमध्ये जादा वर्गखोल्या बांधणे, तसेच पेठापूर- नर्दीपूर मार्गाचे रुंदीकरण इ. कामांचा यात समावेश आहे.

करोना महासाथीमुळे गांधीनगरमध्ये सध्या सुरू असलेल्या विकासकामांची गती मंदावली असली, तरी ही महामारी गुजरात किंवा भारताला फार काळ रोखून ठेवू शकणार नाही, असे करोना संसर्गातून अलीकडेच बरे झालेले शहा म्हणाले.