देशातील सर्वत उंच व्यक्ती अशी ओळख असलेल्या धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्याकडे मदत मागितली आहे. आर्थिक चणचण असल्याने उपचारासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी आदित्यनाथ यांच्याकडे केलीये.

8 फुट इतकी उंची असलेल्या 45 वर्षीय धर्मेंद्र यांना ‘हिप रिप्लेसमेंट सर्जरी’ करायची आहे. या शस्त्रक्रियेसाठी आठ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना सामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगता येऊ शकते. त्यासाठी त्यांना पैशांची गरज आहे. पण, एवढी मोठी रक्कम आवाक्याबाहेर असल्याने त्यांनी थेट उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्यासाठी काल (17 ऑगस्ट) मुख्यमंत्री कार्यालयातही गेले होते. पण, मुख्यमंत्री तेथे नसल्यामुळे त्यांची भेट झाली नाही. मुख्यमंत्र्यांशी भेट झाली नाही, पण त्यांच्या कार्यालयातून मदतीचं आश्वासन देण्यात आलं आहे अशी माहिती धर्मेंद्र यांनी दिली. “नवी दिल्लीमध्ये मला शस्त्रक्रिया करायचीये. मात्र, अद्याप सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. जगभरातून विविध लोकं माझ्यावर डॉक्युमेंट्री बनविण्यासाठी येतात. त्यामुळे सरकारने थोडाफार विचार करुन मला मदत करावी” असं धर्मेंद्र वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना म्हणाले.

उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये राहणा-या धमेंद्र यांच्या नावाची लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद आहे. भारतातील सर्वात उंच व्यक्ती असलेल्या धर्मेंद्र सिंह यांच्यासाठी त्यांची उंचीच आता समस्या बनली आहे. उंची जास्त असल्याने त्यांना सामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.