देशात करोनाच्या रुग्णांची संख्या १२ हजार ७५९ एवढी झाली आहे. १५१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत देशभरात करोनामुळे ४२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजण्यात येत आहेत. एवढंच नाही तर WHO सोबतही चर्चा झाल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. देशात लॉकडाउनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत आम्हाला उपाय योजना करण्यासाठी अवधी मिळेल असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

गेल्या २४ तासात २८ मृत्यूंची नोंद झाली आहे. मृत्यूंचं प्रमाण कमी झालं आहे असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. गेल्या २४ तासात ८२६ करोना पॉझिटिव्ह देशात आढळले आहेत. त्यामुळे आता देशातली करोना रुग्णांची संख्या १२ हजार ७५९ झाली आहे. देशभरात लॉकडाउनचा कालावधी हा ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. १४ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भातली घोषणा केली.

देशातल्या ३२५ जिल्ह्यांमध्ये करोनाचा शिरकाव झालेला नाही अशी माहिती आज आरोग्य मंत्रालयाने दिली. तसंच ज्या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे त्या ठिकाणी काय उपाययोजना करायच्या याबाबत WHO शी चर्चा झाल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.