बेनझीर भुत्तो यांच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयात उपस्थित राहण्याकामी असमर्थता दर्शविल्यामुळे दहशतवादविरोधी न्यायालयाने त्यांच्यावरील खटला २० ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकला.
मुशर्रफ यांच्यावर फौजदारी कटकारस्थानाचा आरोप असून त्यांच्या जिवास धोका असल्याच्या धमक्या येत असल्यामुळे त्यांना न्यायालयात आणण्यात आले नाही. या धमक्यांमुळे त्यांना येथे आणणे सुरक्षेच्या दृष्टीने ठीक वाटले नाही, असे पोलीस तसेच मुशर्रफ यांच्या वकिलांनी न्या. चौधरी हबीबुर रेहमान यांना सांगितले. त्यावर पुढील सुनावणी २० ऑगस्ट रोजी मुक्रर करताना मुशर्रफ न्यायालयात उपस्थित राहतील, याची दक्षता घेण्याची सूचना न्यायाधीशांनी संबंधितांना केली.
मुशर्रफ यांना जबाबदार धरा
पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख यांच्या कारकिर्दीत मानवी हक्क उल्लंघनाच्या घटनांबद्दल त्यांना जबाबदार धरलेच पाहिजे, असे मत ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ ने व्यक्त केले आहे.
परवेझ मुशर्रफ यांच्या राजवटीत मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याच्या घटना, त्यांच्या कारकिर्दीत घडलेले इतर गुन्हे आदींची गंभीर दखल घेऊन आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तरतुदीखाली त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानातील न्यायालयांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे, असे ‘अ‍ॅम्नेस्टी’चे संचालक पॉली ट्रस्कॉट यांनी सांगितले.