पोखरण (राजस्थान)

भारताने रविवारी राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये हेलिकॉप्टरवरून डागता येणाऱ्या रणगाडाविरोधी हेलिना या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हेलिना हे संपूर्ण भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र असून त्यामुळे भारताची संरक्षण क्षमता अनेक पटींने वाढणार आहे. जैसलमेरच्या चंदन रेंजवर घेण्यात आलेली गाइडेड बॉम्बची चाचणीही यशस्वी ठरली आहे.

चीन आणि पाकिस्तान यांच्याविरोधात ही दोन्ही शस्त्रे मोक्याच्या क्षणी महत्त्वपूर्ण ठरू शकतात, हेलिना क्षेपणास्त्राने अत्यंत अचूकतेने आपले लक्ष्य भेदली. टेलिमेण्ट्री स्टेशनपासून या क्षेपणास्त्राच्या संपूर्ण प्रवासावर लक्ष ठेवण्यात आले होते.  सध्या जगातील हे सर्वात अत्याधुनिक रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे.

डीआरडीओ आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी या चाचणीच्या वेळी हजर होते. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन्ही यशस्वी चाचण्यांबद्दल डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. यामुळे भारतीय सैन्यदलाची ताकद मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे.