भारताच्या देशी बनावटीच्या तेजस या विमानाच्या रचनेत बेहरामपूर शहरातील असलेल्या कोटा हरिनारायण यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी या हलक्या लढाऊ विमानाची संरचना नेमकी कशी असावी यात मोठी भूमिका पार पाडली.

तेजस विमाने नुकतीच भारतीय हवाई दलात सामील करण्यात आली आहेत. बंगळुरू येथे काम करीत असलेल्या हरिनारायण यांनी दूरध्वनीवर सांगितले, की आम्ही वीस वर्षे तेजस विमानाच्या रचनेवर काम केले आहे, त्या मेहनतीला अखेर फळ आले व ही विमाने हवाई दलात सामील करण्यात आली. त्यांचा पूर्ण वापर सुरू होईल तेव्हा मला अधिक समाधान वाटेल. हवेतून हवेत मारा करणारी, हवेतून जमिनीवर मारा करणारी तसेच युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्रे यांचा बीमोड हे तेजस विमान करू शकते. दृश्य मर्यादेपलीकडील शत्रूची विमाने यांचा वेध ते घेऊ शकते. चीन, पाकिस्तान यांच्यापेक्षा तेजस लढाऊ विमान चांगले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ते सुसज्ज आहे. १९८० मध्ये या विमानाच्या प्रकल्पाची घोषणा झाली तरी ते स्वदेशी बनावटीचे असावे हे नंतर ठरले, त्यामुळे १९९३ मध्ये त्याचे काम सुरू झाले. त्या वेळी हरिनारायण हे त्या प्रकल्पाचे संचालक होते. एकूण २० शैक्षणिक संस्थांचा यात सहभाग असून कानपूर, खरगपूर व मुंबई आयआयटी यांचा त्यात समावेश आहे.

संरक्षण संशोधन व विकास संस्थांच्या चाळीस प्रयोगशाळा व ५०० अभियंते यांनीही त्यात काम केले आहे. यातील बहुतेक भाग भारतीय बनावटीचे असले तरी काही आयात केलेले आहेत. हरिनारायण आता बंगळुरूत स्थायिक झाले असले तरी ते बेहरामपूरला येत असतात.