विमान कंपनीच्या मॅनेजरच्या हत्याकांडानं बिहारची राजधानी पाटणा हादरली आहे. विमानतळावर कार्यरत असलेल्या इंडिगो विमान कंपनीच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. रुपेश कुमार असं या व्यक्तीचं नाव आहे. कॉलनीच्या गेटवर गाडी आलेली असताना आरोपींनी गोळीबार केला. यात रुपेश कुमार गंभीर जखमी झाले होते.
पाटणातील पुनाईचाक भागातील कुसुम विलास अपार्टमेंट येथे रात्री ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. इंडिगो एअरपोर्ट मॅनेजर असलेले रुपेश कुमार विमानतळावरून घरी येत होते. त्याची कार कॉलनीच्या गेटजवळ येताच काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. आरोपींनी कुमार यांच्या दिशेने तब्बल सहा राऊंड फायर केले. त्यानंतर आरोपी फरार झाले. या गोळीबारात कारमध्ये असलेले कुमार गंभीर जखमी झाले.
आणखी वाचा- नात्याला काळीमा! मोठ्या भावाचा विवाहित बहिणीवर बलात्कार, व्हिडीओही बनवला
बेशुद्धावस्थेत असलेल्या रुपेश कुमार यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, या घटनेवरून विरोधकांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी ट्विट करून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “बिहारमध्ये दररोज होत असलेल्या खून, चोऱ्या, अपहरण आणि बलात्काराच्या शेकडो घटना भाजपाप्रणित नितीश कुमार सरकारची खास काम आहेत,” असा टोला लगावत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणी तेजस्वी यादव यांनी केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2021 11:38 am