जयपूर-मुंबई विमानात बॉम्ब असल्याचा फोन आल्यानंतर जयपूर विमानतळावर एकच खळबळ उडाली. तपासणीअंती धमकीचा हा खोटा फोन असल्याचे निष्पन्न झाले. परंतु, यामुळे विमान उड्डाणास उशीर झाला. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. एका अज्ञात व्यक्तीने पहाटे साडेपाचच्या सुमारास इंडिगो एअरलाईन्सच्या कॉल सेंटरला फोन करून जयपूर-मुंबई विमानात बॉम्ब असल्याचे सांगितले होते. या फोनमुळे सुरक्षा यंत्रणेची मोठी पळापळ झाली. प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. तपासात काहीच आढळून न आल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

अधिक माहिती अशी, इंडिगो कॉल सेंटरला मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने फोन करून 6E 218 या जयपूर-मुंबई विमानात बॉम्ब असल्याची धमकी दिली. कॉल सेंटरने त्वरीत बॉम्ब थ्रेट असेसमेंट कमिटीला (बीटीएसी) याची माहिती दिली. त्यांनी लगेचच सुरक्षेसंबंधीत योग्य ती कार्यवाही केल्याचे इंडिगोने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

बीटीएसीने तपास केला असता त्यांना काहीच आढळून आले नाही. त्यानंतर विमानतळावरील सर्व प्रक्रिया सामान्य झाली. यापूर्वीही मार्च महिन्यात दिल्ली-कोलकाता या एअर इंडियाच्या AI-020 या विमानात बॉम्ब असल्याचा फोन आला होता. पण त्यावेळीही काहीच आढळून आले नव्हते.