इंडिगोच्या विमानात डास चावण्याची तक्रार करणं एका डॉक्टरांना चांगलंच महागात पडलंय. कारण डासांची तक्रार केली म्हणून त्यांना थेट विमानातून उतरवण्यात आलं. विमानातून उतरवताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, शिवाय त्यांच्याकडून माफीनाम्याची मागणीही करण्यात आली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इंडिगोने स्पष्टीकरण दिलं आहे. तक्रारीचं निवारण करण्याआधीच डॉक्टरांना राग अनावर झाला, असं इंडिगोने म्हटलं आहे. डॉक्टरांकडून कोणतीही लिखीत तक्रार मिळाली नसल्याचं विमानतळ प्रशासनाने सांगितलं आहे.

डासांमुळे प्रवासी होते हैराण –
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी इंडिगोच्या लखनऊ येथून बंगळुरूला जाणा-या 6 ई-541 विमानात हा प्रकार झाला. हार्ट स्पेशलिस्ट डॉ. सौरभ राय याच विमानाने बंगळुरूला जाण्यासाठी बसले. ज्या ठिकाणी ते बसले होते त्यांच्या मागच्या सीटवरील लहान मुलं डासांच्या चावण्याने हैराण झाले होते. अनेक प्रवाशांनी इंडिगोच्या क्रू मेंबर्सकडे याबाबत तक्रार देखील केली होती. त्यानंतर डॉ. राय यांनीही तक्रार केली. त्यावर राय यांच्याशी अरेरावी करत क्रू मेंबर्सनी चक्क त्यांनाच विमानातून खाली उतरवलं. यानंतर डॉ. सौरभ यांना दुस-या विमानाचं तिकीट काढून बंगळुरूला जावं लागलं. डॉक्टरांकडून कोणतीही लिखीत तक्रार मिळाली नसल्याचं विमानतळ प्रशासनाने म्हटलं आहे.

दरम्यान, याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इंडिगोवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.