आई-वडिलांच्या आपल्या मुलांकडून खूप अपेक्षा असतात. आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर बनावं किंवा एखाद्या मोठ्या हुद्यावर तरी त्यांनी काम करावं, असं जवळपास सगळ्याच आई-वडिलांना वाटत असतं. पण खूप कमी लोकांचे हे स्वप्न सत्यात उतरते. अशीच एक चेन्नईतील गोष्ट समोर आली आहे. एका मुलाने आपल्या आयुष्यातील एका नवीन वळणाची सुरूवात आई आणि आजीला नमस्कार करून केली. चेन्नईतील एका वैमानिकाने आपल्या पहिल्या विमान उड्डानापूर्वी आई-आजीचे पाय घरून आशिर्वाद घेतले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो विमानाचे पायलट प्रदीप कृष्णन पहिल्यांदाच विमान चालवणार होते. त्याआधी विमानामध्ये प्रवास करत असलेल्या आई आणि आजीला नमस्कार केला. विमानाच्या उड्डाणापूर्वी प्रदीप आपल्या कुटुंबाकड येतो आणि आई-आजीचे दर्शन घेतल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. ज्यावेळी मुलगा पायलट असेल तेव्हाच विमानाने प्रवास करणार अशी शपथ प्रदीप कृष्णनची आई आणि आजीने घेतली होती.

प्रदीपच्या या मनाच्या मोठेपणामुळे विमानात प्रवास करणारे इतर प्रवाशीही भावूक झाले होते. प्रदीपच्या मित्राने या भावनिक प्रसंगाचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. सध्या या व्हिडीओला नेटीझन्सकडून चांगला प्रतिसाद मिळत असून प्रत्येक जण प्रदीपची स्तुती करत आहे.