दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाला इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली. या सगळ्या धक्काबुक्कीचा व्हिडिओच ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर याप्रकरणी माफी मागितली आहे. राजीव कात्याल असे प्रवाशाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. चेन्नईतून त्यांनी दिल्लीला येण्यासाठी 6E 487 या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केले. विमानातून उतरल्यानंतर कात्याल यांचा इंडिगोच्या कर्मचाऱ्यांशी वाद झाला. कात्याल यांनी शिवी दिल्याचा आरोप इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे कात्याल आणि कर्मचारी यांच्यात वाद सुरु असताना या कर्मचाऱ्यांनी त्यांना बसमध्ये जाऊ दिले नाही. त्यानंतर इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि त्यांना धक्काबुक्की केली. धक्काबुक्की करून त्यांना जमिनीवर पाडले. दोनपैकी एका इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी कात्याल यांचा गळा धरला. कात्याल त्याच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. काही तरी गैरसमजातून हा प्रकार घडल्याच पोलीस अधिकारी संजय भाटिया यांनी म्हटले आहे. कात्याल किंवा इंडिगो एअरलाइन्सकडून आमच्याकडे या संदर्भात तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास योग्य पावले उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पाहा व्हिडिओ