अफगाण प्रासादाच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांची स्तुतिसुमने

भारतीय आणि अफगाण नागरिक यांची मैत्री ऐतिहासिकच नाही तर मनात व हृदयात खोलवर रुजलेली आहे, असे प्रशंसोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काढले. अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील ‘कस्र-ए-स्तोर’ या नूतनीकृत राजवाडय़ाचे मोदी आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी संयुक्तरीत्या उद्घाटन केले. मोदींनी नवी दिल्लीतून या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली. त्या प्रसंगी मोदींनी उभय देशांच्या मैत्रीचे गोडवे गायले.

आज आपण दोन्ही देशांतील मैत्रीमधील आणखी एक यशस्वी टप्पा साजरा करत आहोत. जे लोक अफगाणिस्तानमधील दहशतवादाच्या छायांपलीकडे पाहू शकत नाहीत त्यांच्यासाठी नूतनीकृत स्तोर प्रासाद म्हणजे अफगाणिस्तानच्या वैभवशाली परंपरेचे प्रतीक आहे, असे मोदी म्हणाले.

अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आवारात वसलेल्या या प्रासादाच्या नूतनीकरणात भारताने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. स्तोर प्रासाद १९०२ साली अमीर अब्दुर रहमान खान यांच्या काळात बांधला गेला. त्यानंतर विसाव्या शतकात त्याचे दोन वेळा विस्तारीकरण झाले. ज्या रावळपिंडी करारानुसार अफगाणिस्तानला स्वातंत्र्य मिळाले त्या करारावर याच प्रासादाच्या एका दालनात १९१९ साली स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.

या प्रसंगी मोदींनी या वर्षांच्या सुरुवातीला भारत, अफगाणिस्तान आणि इराण यांच्यात झालेल्या संयुक्त वाहतूक कराराचा उल्लेख करत उभय देशांच्या संबंधांतील तो एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. भारताच्या सहकार्याने अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात बांधल्या गेलेल्या आणि नुकतेच उद्घाटन झालेल्या सलमा धरणाने केवळ हेरातच्या कृषी आणि आर्थिक विकासाला हातभार लागणार नसून त्या देशाच्या समग्र विकासात मोठी भूमिका वठवणार असल्याचे त्यांनी म्हटले. दहशतवादाचा नायनाट करून शांतता स्थापित करण्याच्या आणि संपन्न व समर्थ अफगाणिस्तानची उभारणी करण्याच्या स्वप्नात सव्वाशे कोटी भारतीय कायम तुमच्या बाजूने उभे आहेत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

अफगाण अध्यक्ष अश्रफ घनी यांनी भारताच्या मदतीबद्दल आभार मानत देशात शांतता स्थापित करून विकास साधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.