पूर्व लडाख व सिक्कीममधील चीनलगत सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या मुद्दय़ावर भारत व चीन यांच्या लष्करात लेफ्टनंट कर्नल पातळीवर शनिवारी चर्चा झाली. या चर्चेत काय झाले त्याचा उल्लेख न करता भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारत व चीन यांच्या अधिकाऱ्यांमध्ये यापुढेही लष्करी व राजनैतिक मार्गाने चर्चा सुरू राहील. त्यातून भारत व चीन यांच्यात सीमेवर सध्या सुरू असलेला वाद मिटवण्यास मदत होणार आहे.

भारतीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल हरींदर सिंग यांनी केले. ते लेह येथील १४ व्या कोअरचे प्रमुख अधिकारी आहेत. चीनच्या बाजूने तिबेट लष्करी जिल्हा विभागीय  कमांडरने चर्चेत नेतृत्व केले. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक चीनच्या हद्दीतील  माल्डो येथे लष्करी शिष्टमंडळादरम्यान चर्चा झाली.

यापूर्वी स्थानिक कमांडरच्या पातळीवर भारत व चीन यांच्या दरम्यान चर्चेच्या बारा फे ऱ्या झाल्या होत्या. त्यानंतर चर्चेच्या तीन फे ऱ्या मेजर जनरल पातळीवर झाल्या होत्या पण त्यातून काही फलनिष्पत्ती झाली नाही.

दोन्ही देशांत एकमेकांसाठी आक्षेपाच्या मुद्दय़ांवर शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचे ठरवण्यात आले आहे.  भारतीय  शिष्टमंडळाने पूर्व लडाखमधील गोगरा, गलवान खोरे, पँगाँग त्सो या भागात पुन्हा पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण करावी. चिनी लष्कराच्या मोर्चेबांधणीलाही विरोध करण्याचा पवित्रा चर्चेत घेणार येणार असल्याचे आधी सांगण्यात आले. भारताने आपल्या हद्दीत सुरू केलेल्या रस्ते व पायाभूत सुविधांच्या बांधकामांना विरोध न करण्याचे आवाहन चीनला केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते.