युरोप दौऱ्यावरून परतल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि चीनचे समकक्ष प्रतिनिधी वांग यी यांची आज बीजिंग येथे भेट झाली. यावेळी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत चीनचे परराष्ट्रमंत्री यी यांनी ही माहिती दिली. २७ आणि २८ एप्रिल रोजी अनौपचारिक उच्चस्तरीय बैठकीत मोदी आणि जिनपिंग हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत, अशी माहिती यावेळी यी यांनी दिली.

दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमधील बैठकीत द्विपक्षीय संबंधात सुधारणेसाठी आणि उच्चस्तरीय संवादाची गती वाढवण्यावर चर्चा झाली. यावेळी सुषमा स्वराज म्हणाल्या, दोन्ही देश दहशतवाद, हवामान बदल आणि जागतिक आरोग्य यांसारख्या मुद्द्यांवर एकत्र काम करणार आहेत. तर चीनकडून २०१८ मध्ये सतलज आणि ब्रह्मपुत्रा नदीबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

शांघाई सहकार्य संघटनेच्या (एससीओ) मंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेण्यासाठी सुषमा स्वराज शनिवारी चार दिवसांच्या दौऱ्यासाठी चीन दौऱ्यावर गेल्या आहेत. द्विपक्षीय भेटीपूर्वी वांग यांनी पेइचिंग येथील दिआयुतई स्टेट गेस्ट हाऊस येथे सुषमा स्वराज यांचे स्वागत केले. स्टेट काऊंसिलर झाल्यानंतर वांग आणि स्वराज यांची ही पहिलीच भेट झाली.

या भेटीदरम्यान, सुषमा यांनी वांग यांना स्टेट काऊंसिलर झाल्याबद्दल आणि भारत चीन सीमेसंदर्भात विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केल्याबद्दल अभिनंदन केले. दरम्यान, वांग यांनी सांगितले की, द्विपक्षीय संबंधांमध्ये उल्लेखनीय विकास झाला आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांच्या नेत्यांच्या देखरेखीखाली या वर्षी सकारात्मक गोष्टीही घडल्या आहेत.