भारतीयांचे बुलेट ट्रेनचे स्वप्न लवकरचं पूर्ण होणार असून भारत आणि जपान या दोन्ही देशात यासंदर्भात करार झाला आहे. हैदराबाद हाऊस येथे दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
या करारानुसार येत्या सात वर्षांमध्ये जपान भारताला बुलेट ट्रेन तयार करून देणार आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यान ही रेल्वे धावणार आहे.  बुलेट ट्रेन प्रकल्प यशस्वी झाल्यास मुंबई व अहमदाबादमधील प्रवासाचा वेळ सात तासांवरुन अवघ्या दोन तासांवर येईल. बुलेट ट्रेनकरिता ५०५ किलोमीटर लांब मार्ग तयार करण्यासाठी सुमारे ९८ हजार कोटी रूपयांचा खर्च होणार असून, जपानने प्रकल्पासाठी ८० टक्के अर्थसाह्य दिले आहे. दिलेल्या कर्जावर एक टक्क्यापेक्षा कमी दराने व्याज आकारण्यात येणार आहे.  दरम्यान बुलेट ट्रेनव्यतिरिक्त दोन्ही देशांमध्ये होत असलेल्या अणुकरार व संरक्षण क्षेत्रातील उपकरणांच्या खरेदी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जपानी नागरिकांना येत्या मार्च महिन्यापासून भारतात आगमन झाल्यानंतर व्हिसा देण्याची घोषणाही केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान हा भारताच्या विकासात मोठा भागीदार असल्याचे मत या समझोत्यानंतर व्यक्त केले. भारत आणि जपानमध्ये संयुक्त युध्दाभ्यास होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची लवकरच पुनर्रचना करण्याची गरज असल्याचे मत जपानचे पंतप्रधान शिंजो एब यांनी व्यक्त केले आहे.