पठाणकोट हल्ल्याच्या सूत्रधारांवरील कारवाईचे भारताकडून स्वागत

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज, शुक्रवारी प्रस्तावित असलेली परराष्ट्र सचिव पातळीवर चर्चा अखेर पुढे ढकलण्याचा निर्णय उभय बाजूंनी घेण्यात आला. आता ही चर्चा मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. पठाणकोट येथील दहशतवादी हल्ला आणि त्यात जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी संघटनेचा असलेला हात, या बाबी उघड झाल्यानंतर भारताने जैशच्या नेत्यांवर कारवाई करण्यासाठी पाकवर दबाव आणला होता. पाकिस्तानने बुधवारी त्यानुसार जैशच्या नेत्यांवर कारवाई केली. मात्र या सर्व पाश्र्वभूमीवर उभय देशांतील सचिव पातळीवरील चर्चेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा आज, शुक्रवारी होणार होती. भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर त्यासाठी इस्लामाबादला रवानाही होणार होते. मात्र गेल्या आठवडय़ात पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या चर्चेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या पाक दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे स्पष्ट धागेदोरे भारतीय तपास यंत्रणांना मिळाले. त्यानंतर दोषींवर कारवाई करण्याची तत्परता पाकिस्तानने दाखवावी, असे बजावत भारताने पाकवर दबाव आणला होता. त्यानुसार बुधवारी पाकिस्तानने जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अझर व त्याचा भाऊ अब्दुल रौफ यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चर्चा अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाच ही कारवाई करण्यात आली. या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी उभय देशांत चर्चा होणार की नाही, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. गुरुवारी दोन्ही देशांच्या परराष्ट्र  सचिवांची दूरध्वनीद्वारे चर्चा होऊन चर्चा लांबणीवर टाकण्याच्या मुद्दय़ावर एकमत झाले.

दिवसभरातील घडामोडी..

  • परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधानांशी विचारविनिमय करून परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चेवर निर्णय घेतला
  • चर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानी परराष्ट्र खात्याला कळवला.
  • पाक परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते काझी खलिलुल्ला यांनी तशी अधिकृत घोषणा केली
  • चर्चा आताच झाल्यास त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, असा उभय देशांचा सूर
  • चर्चा पुढे ढकलून मार्चमध्ये घेण्याच्या मुद्दय़ावर उभय देशांत एकमत

जैशच्या म्होरक्यावर करण्यात आलेली कारवाई स्वागतार्ह आहे. मात्र अजूनही पाकिस्तानकडून ठोस कारवाईची अपेक्षा आहे. पठाणकोट हल्ल्याच्या तपासासाठी त्यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या एसआयटीला तपासासाठी भारतात येण्यास काहीही आडकाठी नाही.

विकास स्वरूप, भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते