पठाणकोटबाबत निर्णायक कारवाईची अपेक्षा

पठाणकोटच्या दहशतवादी हल्ल्याबाबत भारताने पाकिस्तानला कृती करण्याइतपत पुरावे दिले आहेत. त्यामुळे त्याच्या आधारे पाकिस्तानने हल्लेखोरांविरुद्ध ‘तत्पर आणि निर्णायक’ कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करून आणि दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चेशी प्रस्तावित कारवाईचा संबंध जोडून भारताने चर्चेचा चेंडू थेट पाकिस्तानच्या कोर्टात टोलावला आहे.

दरम्यान, पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पठाणकोटच्या वायुसेना तळावर दहशतवादी हल्ला केल्यामुळे भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाझ अहमद चौधरी यांच्यात १५ जानेवारीला होऊ घातलेल्या बोलण्यांवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. या तारखेपूर्वीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना भेटणे शक्य व्हावे यासाठी ही बोलणी पुढे ढकलली जातील अशी अटकळ बांधली जात आहे.

गुरुवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांच्यावर परराष्ट्र सचिवस्तरीय बोलण्यांबाबत प्रश्नांचा भडिमार झाला, परंतु ही बोलणी ठरल्यानुसार होतील की पुढे ढकलली जातील याबत त्यांनी ठोस उत्तर दिले नाही. पाकिस्तानने किती कालावधीत अशी कारवाई करावी यासाठी आम्ही कुठलीही मुदत घालून दिलेली नसल्याचे सांगून, भारताच्या या मागणीमुळे प्रस्तावित बोलणी फिस्कटतील, हे म्हणणे त्यांनी फेटाळून लावले. अजून पाकिस्तानशी काही चर्चा झाली नसल्याचे स्वरूप यांनी सांगितले. आम्ही पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात केला आहे, परंतु म्हणून आम्ही सीमेपलीकडील दहशतवाद खपवून घेणार नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बँकॉकमध्ये झालेल्या रचनात्मक बैठकीनंतर दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय सर्वसमावेशक बोलणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यावेळी दहशतवाद, तसेच नियंत्रण रेषेवरील शांतता व सुरक्षा या कळीच्या मुद्दय़ांवर चर्चा झाली होती. ताज्या हल्ल्यामुळे सीमेपलीकडील दहशतवादाचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे, असे स्वरूप म्हणाले.