शांतीशिवाय प्रगती होत नाही, त्यामुळे दोन्ही देशांत शांततेचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करू असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले.
मोदींसोबत ‘हैदराबाद हाऊस’मध्ये झालेल्या चर्चेनंतर नवाझ शरीफ यांनी पत्रकारपरिषदेत भारतीय माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की, “मोदींनी शपथविधीसाठीचे आमंत्रण दिले त्याचा आनंद आहे. भेटीदरम्यान मोदींशी सकारात्मक चर्चा झाली असून नव्या संबंधांबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. शांततेसाठीही ऐतिकासिक संधी आहे असे दोघांचेही मत आहे तसेच शांतीशिवाय प्रगती होत नाही त्यामुळे दोन्ही देशांतील शांतीसाठी मिळून काम करू. देशातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचीही नवी सुरूवात आहे. दोन्ही देशांनी एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे.” तसेच सर्व मुद्द्यांवर भारताशी चर्चा करण्यास पाकिस्तान सरकार तयार असल्याचेही शरीफ म्हणाले.
बैठकीत झालेल्या सर्व मुद्द्यांवर शरीफ यांनी सविस्तर माहिती दिली नसली, तरी दोन्ही देशांतील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचे ते म्हणाले. तसेच दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव भारत-पाक संबंधांना बळकटी आणण्याच्या उद्देशाने सतत संपर्कात राहतील असेही ते पुढे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांतील शत्रुत्वाच्या दृष्टीकोनाला बाजूला सारून सहकार्यासाठी प्रयत्न करावयास हवा असेही शरीफ म्हणाले आहेत.