पाकिस्तानच्या कलाकारांचे कार्यक्रम उधळून लावण्याचे प्रकार अलीकडेच घडलेले असतानाही मध्य प्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रसिंह यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांच्या स्मृत्यर्थ ‘भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मुशायरा’ कार्यक्रम आयोजित केला आहे. येत्या ५ नोव्हेंबर रोजी अर्जुनसिंह यांची जयंती असून त्यानिमित्त ‘यादें अर्जुनसिंह’ हा भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मुशायरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कराचीतील प्रसिद्ध कवी फरहात शहझाद आणि देशातील कवी मुन्वर राणा, राहत इंदोरी, मंझर भोपाळी, विजय तिवारी आणि अंजूम रेहबर आदी या मुशायरा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पाकिस्तानाहील आणखी एक प्रसिद्ध कवी अब्बास तबीश हेही मुशायरा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांचा व्हिसा आणि अन्य औपचारिकता वेळेत पूर्ण झाल्यास ते येणार आहेत, असे सांगण्यात आले.