भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हीला इंडोनेशिया ओपनच्या अंतिम सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे तिचे यंदाच्या मोसमातील पहिले सुवर्णपदक हुकले त्यामुळे तिला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. यामागुचीने सिंधूला सलग दोन सेटमध्ये २१-१५ आणि २१-१६ गुणांनी हरवले.

या वर्षातील आपला पहिला अंतिम सामना खेळणारी पी. व्ही. सिंधूने संपूर्ण सामन्यात कमजोर खेळ केला. त्या तुलनेत यामागुचीच्या जबरदस्त खेळापुढे ती टिकू शकली नाही. यापूर्वी हे दोन्ही खेळाडू १४ वेळा आमनेसामने आले होते. यामध्ये सिंधू १०-४ ने आघाडीवर होती. आजचा हा १५ वा सामना जिंकत यामागुचीने पाच वेळा सिंधूविरोधात विजय मिळवला.

अंतिम सामन्यासाठी हे दोन्ही खेळाडू बॅडमिंटन कोर्टमध्ये पोहोचल्यानंतर लगेचच यामागुचीने आक्रमक खेळाला सुरुवात करीत पहिल्या सेटमध्ये ३-० ने आघाडी घेतली. सुरुवातीला पिछाडीवर गेलेल्या सिंधुने नंतर चांगले पुनरागमन केले आणि ५-३ ने ती पुढे निघून गेली. त्यानंतर सिंधूने यामागुचीच्या शॉटवर रिव्ह्यू मागितला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही त्यामुळे स्कोअर ५-५ असा बरोबरीत राहिला. त्यानंतर एका एका गुणासाठी दोन्ही स्टार खेळाडूंमध्ये संघर्ष पहायला मिळाला. त्यानंतर सिंधूच्या एका शॉटवर यामागुचीने देखील एक रिव्ह्यू मागितला त्यानंतर स्कोअर ९-९ असा बरोबरीत राहिला. त्यानंतर सिंधुने मुसंडी मारत १२-९ ने आाघाडी घेतली. मात्र, त्यानंतर यामागुचीने उत्कृष्ट खेळ करीत पहिला सेट २१-१५ ने जिंकला.

त्यानंतर दुसरा सेट सुरु झाल्यानंतरही यामागुचीने जबरदस्त खेळाला सुरुवात केली. त्यावेळी ती सिंधूला मागे टाकत ४-१ ने पुढे निघून गेली. १३ मिनिटांच्या खेळानंतर सिंधू ८-११ ने पिछाडीवर राहिली. त्यानंतर यामागुचीने अत्यंत चांगला खेळ करीत सिंधूला पुढे येण्याची संधीच दिली नाही. त्यानंतर अखेर ५१ व्या मिनिटाला सिंधूने हा सामना १६-२१ गुणांनी गमावला.