इंडोनेशियातील सुलासेवी बेटाला ७.५ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. याठिकाणी त्सुनामी आली असून त्यामुळे या भागातील ८०० जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या बेटावर १० फूट उंचीच्या लाटा आल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले. या लाटांचा जोर इतका जास्त होता की त्यामुळे पाणी इमारतींमध्ये शिरले. याठिकाणी असलेल्या पालू या प्रांतातील लोकांना या त्सुनामीचा मोठा फटका बसला असून अनेकांची घरे यामध्ये उध्वस्त झाली आहेत. त्सुनामीचा जोर इतका जास्त होता की त्यामध्ये अनेक घरे वाहून गेली आणि त्यातच अनेकांचा मृत्यू झाला. पालू भागातील लोकांच्या मदतीसाठी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून सैन्यदल आणि इतर यंत्रणा पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

या दुर्घटनेमध्ये काही परदेशी नागरिकही बेपत्ता झाले आहेत. याठिकाणी मोठ्या स्तरावर बचावकार्य सुरु असून प्रतिकूल परिस्थितीमुळे या मदतकार्यात अडचणी येत असल्याचे स्थानिक माध्यमांकडून मिळालेल्या माहितीवरुन समजत आहे. ज्या पालू भागाला या त्सुनामीचा फटका बसला आहे तेथील लोकसंख्या अवघी तीन लाख आहे. मृत नागरिकांबरोबरच असंख्य लोक यामध्ये जखमी झाले आहेत तर बरेच जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. त्सुनामीचा वेग मोठा असल्याने येथील वीजपुरवठा आणि दूरध्वनी यंत्रणा बंद पडली आहे, त्यामुळेही मदतकार्यात अडचणी येत आहेत.