भूस्खलन होण्याची शक्यता, ज्वालामुखीचा उद्रेक सुरूच

इंडोनेशिया : ज्वालामुखीचा उद्रेक झालेल्या सागर किनाऱ्यावरील  भागात जाण्याचे लोकांनी टाळावे, असा इशारा इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी दिला असून या अलीकडेच तेथे आलेल्या सुनामी लाटांनी ४२९ बळी घेतले आहेत.

दरम्यान २६ डिसेंबर २००४ रोजी झालेल्या भूकंप व सुनामीच्या घटनेला चौदा  वर्षे पूर्ण झाली असून  आताच्या सुनामी लाटा या अनाक क्रॅकाटोआ  किंवा टाइल्ड ऑफ क्रॅकाटोआ या ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे शनिवारी रात्री सुंदा सामुद्रधुनीच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात फटका बसला. ज्वालामुखीमुळे भूस्खलन झाल्याने या लाटा उसळल्या होत्या त्यामुळे जावा व सुमात्रा या बेटांनाही सुनामीचा फटका बसला.

इंडोनेशियाच्या हवामान, भूगर्भशास्त्र व हवामान संस्थेने सांगितले की, लोकांनी सामुद्रधुनी व सागरी किनाऱ्यापासून ५०० मीटर ते १ किलोमीटर अंतराच्या पट्टय़ात जाऊ नये. सरकारी कामगार अनाक क्रॅकाटोआ येथे देखरेख करीत असून तेथे बुधवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आताच्या परिस्थितीत तेथे पुन्हा भूस्खलन होण्याची शक्यता असून ज्वालामुखीचा उद्रेक जारी आहे. त्यामुळे सुनामी लाटा पुन्हा येऊ शकतात असे संस्थेच्या प्रमुख द्विकोरिटा कर्णावती यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, लोकांनी सतर्क रहावे पण घाबरून जाऊ नये. यावेळची सुनामी आली तरी कुठलीही पूर्वसूचना देता आली नाही याचे कारण ही सुनामी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेली होती.

भूकंपामुळे येणाऱ्या सुनामीची सूचना देण्याची यंत्रणा सध्या उपलब्ध आहे. १४ वर्षांपूर्वी २६ डिसेंबर २००४ रोजी इंडोनेशियात सुमात्रा बेटाला सुनामीचा फटका बसला होता त्यावेळी ९.१ रिश्टरच्या भूकंपाने सुनामी लाटा उसळल्या होत्या त्यात २ लाख तीस हजार लोक मरण पावले होते. दरम्यान आता सुनामीचा फटका बसलेल्या सुमुर खेडय़ात मदतकार्य सुरू असून त्याचा वेग  कमी आहे.

सुनामी लाटांची उंची यावेळी १ मीटर म्हणजे ३.३ फूट होती असे वैज्ञानिकांचे म्हणणे असून सुमुरच्या रहिवाशांनी त्यांची उंची तीन मीटर म्हणजे १० फूट असल्याचे सांगितले. काहींच्या मते त्यांची उंची ५ मीटर म्हणजे १६.४ फूट होती.