मगरीने हल्ला केल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटना आपण अनेका ऐकतो. कधी पाण्यात तर कधी काठावर या मगरी माणसावर हल्ला करतात. मगरीच्या तावडीत एकदा सापडल्यावर विचारायलाच नको. अशाचप्रकारे मगरीच्या हल्ल्याला बळी पडलेल्या एका व्यक्तीचा इंडोनेशियामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त जमावाने थेट एकामागे एक मगरींनाच मारायला सुरुवात केली. यामध्ये जमावाने एक दोन किंवा दहा बारा नाही तर जवळपास ३०० मगरींचा खात्मा केला. आपल्या गावातील व्यक्तीला मारल्याचा राग यातून व्यक्त झाल्याचे दिसून आले. इतक्या मगरी मारल्यामुळे याठिकाणी मगरींचा खच बघायला मिळाला.

इंडोनेशियातील पापुआ प्रांतात सुगितो नामक ४८ वर्षीय व्यक्ती गुरांना चरण्यासाठी घेऊन गेला होता. त्यावेळी मगरीने त्यांच्यावर हल्ला केला आणि या हल्ल्यातच त्यांचा प्राण गेला. याठिकाणी रहिवासी क्षेत्रामध्ये क्रोकोडाईल फार्म आहे. या फार्मला नागरिकांचा आधीपासूनच विरोध होता. त्यातच सुगितो यांचा जीव गेल्याने हा राग आणखी वाढला. सुगितो यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी असंख्य लोक जमले होते. या लोकांनी राग अनावर झाल्याने मगरींना मारण्याचे ठरविले. त्यानंतर फावडे, सुरी, चाकू घेऊन त्यांनी चार इंचाच्या पिल्लापासून २ मीटरच्या मगरींपर्यंत जवळपास ३०० मगरींना मारले.

बास्सार मानुलँग या स्थानिक वन्यजीव संस्थेने सुगितो यांच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे कबूल केले होते. त्याबाबतचा सांत्वनपर निरोपही संस्थेने त्यांच्या कुटुंबियांना पाठवला होता. मात्र तरीही जमावाने हे कृत्य केले. जमाव इतका संतापला होता की पोलिसांनाही जमावाला थांबविणे कठिण झाले होते. आता हे कृत्य केलेल्यांचा शोध पोलिस घेत असून त्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे. याआधीही इंडोनेशियामध्ये मगरीने माणसावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. मार्च महिन्यामध्ये पामच्या मळ्यात काम करणाऱ्या एका कामगारावर मगरींनी हल्ला करुन त्याला मारल्यानंतरही एका सहा मीटर लांब मगरीला मारण्यात आले होते.