इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण केल्यानंतर श्रीविजय एअरचे प्रवासी विमान बेपत्ता झाले आहे. बोइंग ७३७ प्रकारच्या या विमानात ६२ प्रवासी होते. उड्डाणानंतर काही मिनिटात या विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. हे विमान समुद्रात कोसळल्याची शक्यता आहे.

जावाच्या समुद्राचे अंतर पार करायला सरासरी ९० मिनिटे लागतात. फ्लाइट रडार २४ च्या डाटानुसार विमान २५० फूट खाली येण्याआधी ११ हजार फूट उंचीपर्यंत पोहोचले होते. जर्कातावरुन उड्डाण केल्यानंतर श्रीविजय एअरचे प्रवासी विमान अवघ्या चार मिनिटात १० हजार फूट उंचीपर्यंत पोहोचले होते. पण अवघ्या एका मिनिटात ते १० हजार फुटापेक्षा पण खाली आले असे फ्लाइट रडार २४ च्या टि्वटर अकाऊंटवर म्हटले आहे.

जर्काताच्या किनाऱ्याजवळ ढिगारा आढळल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितल्याचे वृत्त कोमपास टीव्हीने दिले आहे. पण तो ढिगारा बेपत्ता विमानाचा आहे का? ते अजून स्पष्ट झालेले नाही. इंडोनेशियन बचाव पथकांकडून या विमानाचा शोध सुरु आहे.