नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या स्वच्छता पाहणीत लागोपाठ तिसऱ्या वर्षी इंदूरला पहिला क्रमांक मिळाला आहे. दुसरा क्रमांक छत्तीसगडमधील अंबिकापूरला, तर तिसरा कर्नाटकमधील म्हैसूरला मिळाला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०१९ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एका कार्यक्रमात प्रदान केले. नवी दिल्ली महापालिका भागास स्वच्छ लहान  शहराचा पुरस्कार मिळाला असून उत्तराखंडमधील गौचरला उत्तम गंगा शहराचा मान मिळाला आहे. सर्वात मोठे स्वच्छ शहर म्हणून अहमदाबादला मान मिळाला असून रायपूर हे वेगाने वाढणारे मुख्य शहर ठरले आहे.

स्वच्छ मध्यम शहराचा मान उज्जनला मिळाला असून वेगाने वाढणाऱ्या मध्यम शहरात मथुरा-वृंदावन यांना गौरवण्यात आले आहे. उच्च मानांकित शहरांना महात्मा गांधींचा पुतळा व सन्मानचिन्ह देण्यात आले आहे.  स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये देशाच्या सर्व शहरी भागातील महापालिका व पालिकांनी भाग घेतला होता. त्यामुळे हे सर्वात मोठे स्वच्छता सर्वेक्षण आहे. महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवण्यासाठी मोठे काम केले होते. आता संपलेला कुंभमेळा व तेथील स्वच्छता यातून लोक प्रेरणा घेतील अशी अपेक्षा आहे असे राष्ट्रपती कोविंद  यांनी सांगितले. स्वच्छतेबाबत लोकांची मनोवृत्ती बदलली पाहिजे, व्यक्तिगत व सार्वजनिक अशा दोन्ही पातळीवरील स्वच्छतेवर काम केले पाहिजे. स्वच्छतेची संस्कृती हा आपल्या नागरी जीवनाचा एकात्म भाग झाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, देशातील शहरांमध्ये स्थित्यंतरे होत आहेत. शहरीकरण होत असले तरी ते नियोजनबद्ध असले पाहिजे. आतापर्यंत शहरी मैला व कचरा व्यवस्थापनाचे मुद्दे कधी मध्यवर्ती नव्हते पण आता ते आव्हान म्हणून स्वीकारण्यात आले आहेत.