इंदूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयए-आय) एका विद्यार्थ्याला यंदा वार्षिक ६३.४५ लाख रूपयांच्या पॅकेजच्या नोकरीचा प्रस्ताव आला आहे. आयआयएमच्या प्रवक्त्याने संबंधित विद्यार्थी आणि कंपनीचे नाव जाहीर केलेले नाही. हा प्रस्ताव विदेशातील नोकरीसाठी देण्यात आला आहे. संस्थेच्या अंतिम प्लेसमेंटदरम्यान भारतातील नियुक्तीसाठी वार्षिक ३३.०४ लाखाची नोकरी मिळाली असल्याचे या प्रवक्त्याने सांगितले आहे.

ते म्हणाले, आयआयएम-आयच्या विद्यार्थ्यांना यावर्षी मिळालेल्या पॅकेजची सरासरी ही १८.१७ लाख रूपये इतकी आहे. जी मागील वर्षीपेक्षा १२ टक्क्यांनी अधिक आहे. आयआयएम-आयमध्ये यावर्षी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या ६२४ विद्यार्थ्यांना रोजगार देण्यात देश-विदेशातील २०० हून अधिक कंपन्यांनी उत्सुकता दाखवली. अखेरच्या प्लेसमेंटमध्ये इंदूर आयआयएमच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकरीच्या प्रस्तावामध्ये सर्वाधिक २७ टक्के प्रस्ताव हा आर्थिक क्षेत्रातील विविध व्यवस्थापकीय पदांसाठी मिळालेले आहेत.

तर सल्ला आणि कायदा क्षेत्रातून २४ टक्के नोकऱ्यांचे प्रस्ताव आले आहेत. इंदूर येथे पदव्युत्तर पदवी (पीजीपी) अभ्यासक्रमाच्या ४४३ विद्यार्थी आणि एकात्मिक व्यवस्थापनाच्या (आयपीएम) ११३ विद्यार्थ्यांबरोबर संस्थेच्या मुंबई येथील पीजीपी अभ्यासक्रमाचे ६८ विद्यार्थीही यामध्ये सहभागी झाले होते.