16 January 2021

News Flash

फूटपाथवर अभ्यास करुन मुलीने दहावीच्या परीक्षेत मिळवला फर्स्ट क्लास, महापालिकेनं फ्लॅट गिफ्ट देत केलं कौतुक

फूटपाथवर अभ्यास करुन मुलीने दहावीच्या परीक्षेत मिळवलं घवघवीत यश

(Photo Courtesy: ANI)

दहावीच्या परीक्षेत ६८ टक्के गुण मिळवल्याबद्दल मध्य प्रदेशातील इंदूर महापालिकेने मजुराच्या मुलीला फ्लॅट गिफ्ट देत तिचं कौतुक केलं आहे. भारती खांडेकर असं या मुलीचं नाव आहे. भारती आपल्या कुटुंबासोबत फुटपाथवर राहत होती. तिथेच अभ्यास करत तिने दहावीच्या परीक्षेत हे यश मिळवलं. तिच्या या मेहनतीचं कौतुक करत महापालिकेने तिच्या डोक्यावर छप्पर देत घर गिफ्ट दिलं आहे.

भारती एका सरकारी शाळेत शिक्षण घेत होती. मोठं होऊन आयएएस अधिकारी होण्याची तिची इच्छा आहे. भारतीचे वडील दशरथ खांडेकर रोजंदारीवर काम करतात. त्यांना एकूण तीन मुलं आहेत. दशरथ कधीही शाळेत गेले नाहीत, पण आपली मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केला.

एएनआयशी बोलताना, भारतीने आपल्या यशाचं श्रेय आई-वडील आणि शिक्षकांना दिलं आहे. “मी दहावीत ६८ टक्के गुण मिळवले आहेत. माझ्या यशाचं श्रेय माझ्या आई-वडिलांना जातं. मला शाळेत पाठवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. मी खूप आनंदी असून आयएएस अधिकारी होण्याची माझी इच्छा आहे. आमचा जन्म फूटपाथवर झाला असून तिथेच अभ्यास केला. आमच्या राहण्यासाठी घर नसल्याने फूटपाथवर राहत होतो. मला घर दिल्याबद्दल तसंच पुढील शिक्षणाचा खर्च उचलल्याबद्दल मी प्रशासनाची आभारी आहे,” अशी प्रतिक्रिया भारतीने दिली आहे.

घर मिळाल्याने भारतीच्या वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आपली मुलगी मोठी अधिकारी व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. भारतीची आई लक्ष्मी यांनीदेखील कधी शाळेची पायरी चढलेली नाही. हे यश मिळवण्यासाठी आपल्या मुलीने खूप मेहनत घेतल्याचं त्या सांगतात.

“माझी मुलगी दहावीत उत्तीर्ण झाल्याचा आणि घर मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. याआधी आम्ही फुटपाथवर राहत होतो. आमच्यासाठी आमची मुलगी लक्ष्मी आहे. मी आणि माझे पती दोघेही अशिक्षित आहोत. पण आमची मुलं सरकारी शाळेत शिकत आहेत. आम्हाला महिन्याला दोन हजार रुपये मिळतात. आमच्या मुलीने खूप मेहनत घेतली आहे,” अशा भावना लक्ष्मी यांनी व्यक्त केल्या आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेचे अधिकारी प्रशांत दिघे यांनी भारतीला महापालिकेकडून १ बीएचके फ्लॅट देण्यात आला असल्याचं सांगितलं आहे. “फुटपाथवर राहणाऱ्य मुलीने प्रथम श्रेणीत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आयुक्तांनी याची दखल घेत तिला फ्लॅट गिफ्ट केला आहे. याशिवाय तिच्या पुढील शिक्षणाचा खर्चही उचलला आहे. टेबल, खुर्ची, पुस्तक तसंच कपडे तिला देण्यात आले आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 9:24 am

Web Title: indore municipal corporation gifts flat to labourers daughter for securing first division in class 10 exam sgy 87
Next Stories
1 कुलभूषण जाधव यांच्यावर ‘तो’ निर्णय घेण्यासाठी पाकने आणला दबाव; भारताचा आरोप
2 दहशतवाद संपेपर्यंत ही लढाई सुरूच राहिल : प्रकाश जावडेकर
3 “चीनच्या आक्रमकतेला भारताने सर्वोत्तम उत्तर दिलं”; अमेरिकेकडून शाब्बासकी
Just Now!
X