हिंदी चित्रपटांमध्ये सामान्यपणे पोलीस उशीरा पोहचतात असं दाखवलं जातं. मात्र इंदूरमधील पोलिसांनी रील नाही तर रियल लाइफ हिरो बनत वेळेआधी पोहचून एका तरुणाचे प्राण वाचवले आहेत. एक तरुण आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर झोपला होता. मात्र याबद्दलची माहिती पोलिसांनी मिळताच पोलिसांनी ट्रेनच्याआधी तिथे पोहचून तरुणाला ट्रॅकवरुन बाजूला करत त्याचे प्राण वाचवले.
लसूडिया स्थानक परिसरामध्ये राहणारा एक तरुण कौटुंबिक वादामुळे संतापाच्या भरातच आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर गेला. ट्रेनसमोर आत्महत्या करण्यासाठी तो ट्रॅकवर झोपलाही. मात्र ट्रेन येण्याआधीच पोलीस तिथे पोहचले आणि त्यांनी या तरुणाला ट्रॅकवरुन बाजूला केलं.

देवास नाका परिसरामध्ये पेट्रोलिंग करणारा पोलीस कर्मचारी गौतम पालला एक तरुण आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रेल्वे ट्रॅकवर झोपला असल्याची माहिती जवळच्या पोलीस स्थानकामधून मिळाली. माहिती मिळताच गौतमने १०० क्रमांकाच्या पोलीस व्हॅनला संपर्क साधून पोलिसांच्या तुकडीबरोबर हा तरुण ज्या ठिकाणी ट्रॅकवर झोपला होता तिथे पोहचला. पोलिसांनी या तरुणाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता तो पोलिसांशी हुज्जत घालू लागला. मात्र पोलिसांनी दमदाटी करुन आणि समजूत घालून या तरुणाला ट्रॅकवरुन बाजूला आणले.

पोलिसांनी या तरुणाकडे चौकशी करुन त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती घेतली. त्यानंतर कुटुंबातील नातेवाईकांना फोन करुन घटनास्थळी बोलवले. या तरुणाला आणि त्याच्या नातेवाईकांना पोलिसांनी समज देत दोघांमधील वाद मिटवल्याचे न्यूज १८ हिंदीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. दोघांमधील वाद मिटवून समज दिल्यानंतर पोलिसांनी या तरुणाला कुटुंबियांच्या ताब्यात दिलं.