मध्य प्रदेशमधील इंदूर शहराजवळ लॉकडाउनच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या एका वाढदिवसाच्या पार्टीसाठी उपस्थित असणाऱ्या एकाच कुटुंबातील २० जणांना करोनाचा लागण झाली आहे. इंदूरजवळील सानवर येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या वाढदिवसाच्या पार्टीनंतर कुटुंबातील ७० वर्षीय महिलेचा सात दिवसानंतर मृत्यू झाला आहे. ही पार्टी १६ मे रोजी झाली असली तरी हा संपूर्ण प्रकार आता उघडकीस आला आहे. २३ मे रोजी या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या शरिरातील स्वॅबची चाचणी करण्यात आली असता ती करोना पॉझिटीव्ह असल्याचे उघड झाले. आता या महिलेच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी करण्यात आली असता कुटुंबातील १९ जणांना करोनाचा लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. यासंदर्भातील वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.

कुटुंबामध्ये करोनाची लागण झालेल्यांपैकी सर्वात लहान व्यक्ती ही १८ महिन्याचं बाळ असून सर्वात वयस्कर व्यक्ती ६० वर्षीय इसम आहे. सानवर ब्लॉकचे आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत रघुवंशी यांनी “या बर्थडे पार्टीमध्ये ५० ते ६० जण उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे,” असं सांगितलं. मृत महिलेला २१ मे रोजी खोकला, कफ आणि तापाचा त्रास होऊ लागल्यानंतर तिचा मुलगा तिला सनवर येथील रुग्णालयामध्ये तपासणीसाठी घेऊन आला. “ही महिला इंदूरमधील धार रोड येथील रहिवाशी आहे. हे सर्वजण १६ मे रोजी बंडोदियाखान गावातील त्यांच्या नातेवाईकांच्या घरी बर्थ डे पार्टीसाठी गेले होते,” असंही रघुवंशी यांनी स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा- करोनाग्रस्तांच्या संख्येत सर्वात मोठी वाढ; २४ तासात आढळले ७ हजार ४६६ नवे रुग्ण

या महिलेमध्ये करोनाची लक्षणं दिसत असल्याने सनवर रुग्णालयातील डॉक्टरांनी या महिलेला तातडीने इंदूरमधील एमव्हाय रुग्णालयामध्ये पाठवलं. तिथे उपचारादरम्यान दोनच दिवसांनी म्हणजे २३ मे रोजी या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर तातडीने आरोग्य अधिकाऱ्यांनी इंदूरपासून ४० किमीवर असणाऱ्या बंडोदियाखान गावातील या महिलेच्या नातेवाईकाच्या घरी वैद्यकीय पथक पाठवले. “या मृत महिलेच्या नातेवाईकांच्या कुटुंबातील १९ जणांनी एमव्हाय रुग्णालयामध्ये करोना चाचणीसाठी २३ मे रोजी स्वॅब सॅम्पल दिले. या सर्वांच्या स्वॅब टेस्टचा निकाल पॉझिटीव्ह आला आहे,” असं रघुवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. या १९ जणांमध्ये कोणतीच लक्षण दिसत नसल्याचं सांगण्यात येत आहे. या १९ जणांपैकी १७ जणांना एमआरटीबी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर दोघांना सेवाकुंज रुग्णालयातील करोना वॉर्डमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. लॉकडाउनचा नियम मोडून वाढदिवसाच्या पार्टीला गेल्याने या कुटुंबावर हे संकट ओढावलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी पार्टीचे आयोजन करणाऱ्या तीन जणांविरोधात शासकीय नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा- चिंताजनक! करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूसंख्येत भारताने चीनलाही टाकलं मागे

खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाच्या सहा टीम्सने या कुटुंबाचे वास्तव्य असणाऱ्या परिसरामधील ५०० घरांचे सर्वेक्षण केलं आहे. यावेळी १३ जणांना करोनासदृष्य लक्षणं दिसून आल्याने त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. हे प्रकरण उघडकीस येण्याआधी सानवरमध्ये केवळ नऊ करोनाग्रस्त रुग्ण आढळले त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याची सरकारी नोंद आहे.