हिलरी क्लिंटन यांचा निवडणुकीत पराभूत झाल्याने माझ्या मुली, समलिंगी कार्यकर्ते, कर्मचारी व श्वेतवर्णीय नसलेले लोक यांच्यात भीतीची भावना निर्माण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत सर्वाच्याच सुरक्षेची काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे, असे पेप्सिको इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नुयी यांनी सांगितले.

न्यूयॉर्क टाइम्स डीलबुक कॉन्फरन्समध्ये त्यांना असे विचारण्यात आले, की ९ नोव्हेंबरला ट्रम्प निवडून आले, तेव्हा तुम्हाला काय वाटले. त्यावर त्यांनी ‘तुमच्याकडे टिश्यू बॉक्स आहे का..’ अशी विचारणा केली, म्हणजेच वाईट वाटले असे त्यांचे उत्तर होते. अस्वस्थ झालेल्या नूयी यांनी सांगितले, ‘ट्रम्प यांच्या विजयाने माझ्या मुली, पेप्सिकोचे कर्मचारी यांचे तर नुकसान झाले आहेच पण श्वेतेतर कर्मचारी व इतरांचेही मोठे नुकसान झाले आहे, माझ्या मुली, माझे कर्मचारी यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना मला उत्तरे द्यायची आहेत.

आमचे कर्मचारी रडत आहेत, जे श्वेतवर्णीय नाहीत, ते कर्मचारी, महिला, एलजीबीटी लोक हेच विचारत आहेत, की आम्ही सुरक्षित आहोत का?’ अशा प्रश्नांना उत्तरे देण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते असे सांगून त्या म्हणाल्या की, देशातील लोकांना सुरक्षिततेची हमी पाहिजे आहे. या निवडणुकीने काही बदलले नाही, निवडणूक चर्चा सर्वानी ऐकल्या. आता सर्वानी एकत्र येऊन देशासाठी काम केले पाहिजे. ट्रम्प यांचे अभिनंदन करताना त्यांनी सांगितले, की ज्यांनी क्लिंटन यांना पाठिंबा दिला ते दु:खात आहेत पण शेवटी आयुष्य थोडेच थांबणार आहे, लोकशाहीची प्रक्रिया घडली, आता सर्वानी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.

निवडणुकीत महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा झालीच नाही, ती काही मुद्दय़ांवरच अडून राहिली, अशी टीका त्यांनी केली.