News Flash

सिंधू संस्कृतीच्या आहारात होतं मांसाहाराचं वर्चस्व; संशोधनातून माहिती आली समोर

गोमांसाचं सेवन सर्वाधिक असल्याचंही संशोधनातून दावा

हिस्सार : सिंधू संस्कृतीच्या उत्खननादरम्यान संशोधन करताना अक्षेता सुर्यनारायणन.

जगातील सर्वात प्राचीन मानवी संस्कृती अशी ओळख असलेल्या सिंधू संस्कृतीबाबत एक नवा खुलासा झाला आहे. या संस्कृतीमध्ये आहारात शाकाहाराऐवजी मांसाहाराचे वर्चस्व होते. तसेच मांसाहारामध्ये गोमांस सर्वाधिक खाल्लं जात होतं, असा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. ‘जर्नल ऑफ अर्कियॉलॉजिकल सायन्स’मध्ये बुधवारी ही माहिती प्रसिद्ध झाली आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.

जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असलेल्या सिंधू संस्कृतीतील सर्व बाबी अद्याप समोर येऊ शकलेल्या नाहीत. याबाबत अद्यापही संशोधन सुरुच आहे. याच संशोधनातूनच आता सिंधू संस्कृतीच्या आहाराबाबत नवी माहिती समोर आली आहे. इथल्या लोकांना मांसाहार पसंतीचा होता त्यातही गोमांसाला प्राधान्य होते, हे इथे आढळलेल्या काही अवशेषांवरुन दिसून आल्याचे या संशोधनात म्हटलं आहे.

केंब्रिज विद्यापीठात शिकत असलेल्या अक्षेता सुर्यनारायणन या पीएचडी स्कॉलर विद्यार्थीनीने हे संशोधन केलं आहे. आपल्या पीएचडीच्या प्रबंधामध्ये तीने या बाबींचा उल्लेख केला असून ‘लिपिड रेसिड्युसेस इन पॉटरी फ्रॉम दी इंडस सिव्हिलायझेशन इन नॉर्थवेस्ट इंडिया’ या शिर्षकाखाली ही माहिती प्रसिद्ध झाली आहे.

हडप्पा संस्कृतीतील लोकांच्या खाण्याच्या सवयी काय होत्या, याचा शोध घेण्याचा प्रयत्न अक्षेता करत आहेत. या संशोधनादरम्यान मातीच्या भांड्यांमध्ये लिपिड या एका स्निग्ध पदार्थाचे अवशेष आढळून आले आहेत. यावरुन इथले लोक प्राणीजन्य पदार्थांचे सेवन करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. उदा. डुक्कर, गुरं-ढोरं, म्हैस, मेंढी आणि बकऱ्यांचं मांस यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थांचाही यात समावेश असल्याचं म्हटलं आहे. हा सर्व भाग उत्तर पश्चिम भारतात होता जो आज हरयाणा आणि उत्तर प्रदेशात आहे. पुण्यातील डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू आणि प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ प्रा. वसंत शिंदे, बनारस हिंदु विद्यापीठाचे प्रा. रविंद्र एन. सिंह त्याचबरोबर केंब्रिज विद्यापीठाचे मरिअम कुबा, ऑलिव्हर ई क्रेग, कार्ल पी. हेरॉन, तमसीन सी ओ कोनेल, कॅमेरॉन ए पॅट्री हे सर्व संशोधक या अभ्यासाचे सहलेखक आहेत.

सूर्यनारायण यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले की, “यापूर्वी सिंधू संस्कृतीत खाद्यपदार्थाच्या सवयींविषयी बरेच अभ्यास झाले असले तरी या कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने त्या काळात घेतल्या जाणाऱ्या पिकांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं.” परंतू आता सूर्यनारायण यांच्या पीएचडीचा जो विषय आहे. त्यामध्ये सिंधु संस्कृतीमध्ये कुठलं अन्न शिजवलं जायचं याचा इथं सापडलेल्या लिपिड नावाच्या एका स्निग्ध पदार्थाच्या अवशेषांच्या अभ्यासातून शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

इथल्या उत्खननात पाळीव प्राण्यांपैकी गुरं, म्हशींचं सर्वात जास्त प्रमाणात आढळून आलं आहे. या प्राण्यांची सरासरी ५० ते ६० टक्के हाडं इथे आढळून आली आहेत. तसेच १० टक्के मेंढ्या, बकऱ्यांची हाड आढळून आली आहेत. गोवंशाच्या हाडांच्या उच्च प्रमाणावरुन सिंधू संस्कृतील लोकांची गोमांसांला अन्न म्हणून सर्वाधिक पसंती असल्याचा दावा यात करण्यात आला आहे. तसेच बकऱ्याचं मांस त्याला पूरक होतं, असं या अभ्यासात म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 10:51 am

Web Title: indus valley civilisation diet had dominance of meat finds study aau 85
Next Stories
1 धक्कादायक! पतीसमोर १७ जणांनी पत्नीवर केला सामूहिक बलात्कार
2 ट्रम्प म्हणतात, “अमेरिकेत अनेकांना करोना झाला हे उत्तम झालं, कारण…”
3 ब्रिटनच्या संसदेत शेतकरी आंदोलनाचा मुद्दा; बोरिस जॉन्सन म्हणाले, “याचा तोडगा भारत-पाकिस्तानला…”
Just Now!
X