पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय हवाईदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्थमान याची पाकिस्तान सुटका करणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक संसदेत केली. या बातमीनंतर देशभरात आणि प्रसारमाध्यमांमध्ये एकच उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. मात्र गेल्या काही दिवसांत भारतीय वृत्तवाहिन्यांनी पुलवामा आणि विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या ताब्यात असतानाचं केलेलं वृत्तांकन अनेक लोकांच्या पचनी पडलेलं नाहीये. दोन देशांपेक्षा भारतीय प्रसारमाध्यमांनाच युद्ध हवं आहे, त्यामुळे या वाहिन्यांवर निर्बंध घालावेत अशी मागणीही सोशल मीडियावर होताना दिसते आहे. याच मागणीचा धागा पकडत प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी, रिपब्लीक टिव्हीच्या ट्विटर हँडलवर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना, बातमीचं वृत्तांकन करताना ताळतंत्र बाळगा असा सल्ला पत्रकार अर्णब गोस्वामी यांना दिला आहे.

मी सहसा प्रसारमाध्यमांच्या धोरणांवर मत व्यक्त करत नाही. मात्र प्रसारमाध्यमांनी अभिनंदन भारतात सुखरुप परतण्याच्या प्रक्रियेमध्ये खोडा घातला जाईल असं वृत्तांकन करता कमा नये. अर्णब आपण वृत्तांकन करताना ताळतंत्र बाळगायलाच हवं…अशा आशयाचा संदेश देत महिंद्रा यांनी प्रसारमाध्यमांचे कान टोचले आहेत.

दरम्यान पाकिस्तानी संसदेत बोलत असताना पंतप्रधान इम्रान खान यांनी, शांततेच्या मार्गाने चर्चेसाठी एक पाऊल पुढे टाकून अभिनंदनची सुटका करणार असल्याचं जाहीर केलं. शुक्रवारी सकाळी वाघा बॉर्डरच्या मार्गे अभिनंदन भारतात परतणार असल्याची माहिती आहे. अभिनंदन यांची सुटका करत तात्काळ भारतात पाठवण्यात यावं अशी मागणी भारताकडून कऱण्यात आली होती. कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.