करोनामुळे देशभरात ठप्प झालेले आर्थिक व्यवहार २० एप्रिलपासून काही प्रमाणात सुरू करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सरकारने बुधवारी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रामुख्याने शेती आणि ग्रामीण भागांतील उद्योग आणि उत्पादन क्षेत्रांना मुभा देण्यात आली आहे.

रोजगार हमीअंतर्गत सिंचन व जलसंधारण, बांधकाम क्षेत्रातील कामांद्वारे रस्तेविकास, बांधकाम प्रकल्पांच्या कामांना परवानगी देण्यात आली आहे. त्याद्वारे मजुरांना काम मिळेल आणि त्यांच्या हाती पैसा उपलब्ध होऊ शकेल. शेती क्षेत्राशी जोडलेले कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसायासारख्या क्षेत्रांतील व्यवहारांनाही टाळेबंदीतून सवलत देण्यात आली आहे.

जीवनावश्यक व बिगरजीवनावश्यक वस्तूंच्या आंतरराज्यीय वाहतुकीलाही परवानगी दिल्याने ट्रक वाहतूकही सुरू होईल. उत्पादन क्षेत्रालाही आधार देण्यात आला असून विशेष आíथक क्षेत्रातील उद्योग कार्यरत होतील. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित उद्योगांनाही मुभा देण्यात आली आहे.

कोणत्या व्यवहारांना परवानगी?

शेती : शेतीशी निगडीत सर्व कामांना परवानगी. कृषी उत्पन्न बाजार सुरू राहतील.

उद्योग-धंदे : महापालिका क्षेत्राबाहेर प्रामुख्याने ग्रामीण भागांतील उद्योगांना मुभा.

रोजगार हमी : नियम पाळून मनरेगाच्या कामांना मुभा. सिंचन व जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य.

बांधकाम क्षेत्र : रस्ते, सिंचन, महापालिका क्षेत्रांतर्गत बांधकाम प्रकल्पांनाही परवानगी.

जीवनावश्यक व खासगी क्षेत्र : वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या तसेच, डीटीएच, केबलसेवा.

मालवाहतूक : जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक वस्तूंच्या राज्यांतर्गत व आंतरराज्यीय वाहतुकीला मुभा.

सार्वजनिक सुविधा : पेट्रोल पंप, सीएनजी पंप खुले राहणार.

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा : घाऊक व किरकोळ बाजार, किराणामालाची दुकाने तसेच, ई-कॉमर्स कंपन्यांच्या व्यवहारांना परवानगी.

मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव झालेले जिल्हे (लाल श्रेणी)

* सर्वदूर प्रादुर्भाव झालेले :  मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलढाणा, मुंबई उपनगर, नाशिक.

* रुग्णांचे समूह (क्लस्टर) असे : कोल्हापूर, अमरावती आणि पालघर

राज्यातील नारंगी श्रेणीतील जिल्हे

* अकोला, लातूर, सातारा, रत्नागिरी, उस्मानाबाद, जळगाव, सिंधुदुर्ग, रायगड, बीड आणि िहगोली.

देशात १,१७३ नवे रुग्ण देशात दिवसभरात १,१७३ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ११,९३३ इतकी झाली. देशातील मृतांची संख्या ३९२ वर पोहोचली आहे. एकूण रुग्णांपैकी ११.४१ टक्के रुग्ण उपचारांनंतर बरे झाले आहेत. रुग्णसंख्या वाढत असली तरी हा समूह संसर्ग नसल्याचा पुनरुच्चार अगरवाल यांनी केला. दरम्यान, राज्यात बुधवारी २३२ नव्या रुग्णांची भर पडली. यामुळे राज्यातील रुग्णसंख्या २९१६ झाली आहे. राज्यात २४ तासांत नऊ जणांचा बळी गेला. दिवसभरात ३६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.