जगभरातील ५३ देशांमधील एकूण ३३३६ भारतीयांना करोना विषाणूचा संसर्ग झाला आणि त्यापैकी २५ जण या रोगाला बळी पडले, अशी माहिती सरकारी सूत्रांनी गुरुवारी दिली.

देशात करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी झालेल्या धोरणात्मक निर्णयाचा भाग म्हणून, परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना तेथून न हलवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे या लोकांनी संयम बाळगणे भाग आहे, असे हे सूत्र म्हणाले.

मलेरियावरील उपचारासाठी वापरले जाणारे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध जगातील ५५ देशांना व्यापारी तत्त्वावर तसेच अनुदान म्हणून देण्याचा निर्णय भारताने घेतला असल्याचीही माहिती या सूत्रांनी दिली.

विदेशातून वैद्यकीय उपकरणे मागवण्याच्या मुद्दय़ावर त्यांनी सांगितले की, भारत करोना विषाणूच्या चाचणीच्या किट्स (टेस्टिंग किट्स) दक्षिण कोरिया व चीनकडून मिळवत आहे. कोविड-१९शी लढा देण्यासाठी जर्मनी, अमेरिका, ब्रिटन, मलेशिया, जपान व फ्रान्स यांच्याकडून वैद्यकीय उपकरणे मागवण्याचाही भारत विचार करत आहे, अशी माहिती या सूत्रांनी दिली.

जपानमध्ये आणीबाणीची व्याप्ती संपूर्ण देशात

जपानमध्ये करोना विषाणूचा फैलाव सुरूच असल्याने, सध्या केवळ टोक्योसह इतर शहरी भागांमध्ये लागू असलेली आणीबाणी संपूर्ण देशात लागू करण्याची घोषणा पंतप्रधान शिंझो आबे यांनी गुरुवारी केली. देशातील १२ कोटी नागरिकांपैकी प्रत्येकाला १ लाख येनची (९३० डॉलर) रोख रक्कम मदत म्हणून देण्याचेही त्यांनी जाहीर केले.

लोकांची वाहतूक कमी करणे आणि ८० टक्क्य़ांपर्यंत सामाजिक अंतर राखण्याचे उद्दिष्ट साध्य करणे हा आणीबाणीची व्याप्ती वाढवण्याचा हेतू असल्याचे ते म्हणाले.

आबे यांनी ७ एप्रिल रोजी मर्यादित स्वरूपात आणीबाणी जाहीर केली होती. ज्या ठिकाणी या विषाणूचा सर्वाधिक धोका असल्याचे मानले जात होते, त्या टोक्यो आणि इतर ६ प्रांतांमध्ये ती लागू होती. या भागांतील लोकांनी घरांमध्येच राहावे अशी विनंती आबे यांनी केली होती, मात्र नंतर उर्वरित देशातही तिचा विस्तार केला.