करोना प्रतिबंधक लसीकरणामुळे वंध्यत्व

करोना प्रतिबंधक लसीकरणामुळे पुरुष व महिलांमध्ये वंध्यत्व येऊ शकते असे दर्शवणारा कुठलाही शास्त्रीय पुरावा नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले. या लशी सुरक्षित व परिणामकारक असल्याचे आढळले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

लसीकरणाबाबतच्या राष्ट्रीय तज्ज्ञ गटानेही स्तनपान देणाऱ्या सर्व महिलांसाठी लसीकरण सुरक्षित असल्याचे सांगून त्याची शिफारस केली आहे आणि लस घेण्यापूर्वी किंवा त्यानंतर स्तनपान थांबवण्याची काहीही गरज नसल्याचेही स्पष्ट केले आहे. प्रजननक्षम वयातील लोकांमध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणामुळे वंध्यत्व येत असल्याची, तसेच स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी लसीकरणाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या बातम्या माध्यमांमध्ये प्रकाशित झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने हे वक्तव्य केले आहे. उपलब्ध असलेल्या लशींपैकी कोणत्याही लशीमुळे पुरुष किंवा महिलांच्या जनक्षमतेवर परिणाम होत नाही; असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.