सीमा रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) सतर्क जवानांनी उधळून लावला. जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानमधून आलेले दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात होते. मात्र बीएसएफच्या जवानांनी गोळीबारात घुसखोरीचा प्रयत्न फसला. गोळीबारात दहशतवाद्यांचा मृत्यू झाला असून सकाळी सीमारेषेवर जाऊन नेमके किती दहशतवाद्यांचे मृतदेह आहेत हे समजेल असे बीएसएफने स्पष्ट केले.

सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर ४ ते ६ दहशतवादी अंधाराचा फायदा घेत भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात होते. हा प्रकार सीमा रेषेवरील जवानांना लक्षात आला. त्यांनी या दहशतवाद्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात काही दहशतवाद्यांचा खात्मा झाला असे बीएसएफने म्हटले आहे. या दहशतवाद्यांचे मृतदेह सीमा रेषेवरच आहेत. सकाळी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊ असे बीएसएफच्या अधिका-यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी भारतीय लष्करासमोरील आव्हानांवर भाष्य केले होते. . छुपे युद्ध, दहशतवाद आणि घुसखोरी या समस्या येणाऱ्या वर्षांमध्ये त्रासदायक ठरतील. पुढील काही वर्ष या समस्यांचा सामना करावा लागेल,’ असे म्हणत बिपिन रावत यांनी लष्करासमोरील आव्हानांवर भाष्य केले. रावत यांचे विधान ताजे असतानाच सीमा रेषेवर घुसखोरीची घटना घडली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी भारतात घुसून सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य करत आहेत. या दहशतवाद्यांना पाकिस्तानी सैन्याकडूनही मदत मिळत असल्याचा दावा भारताने वारंवार केला आहे.

जमात उद दावाचा म्होरक्या हाफिज सईदने संघटनेच्या दहशतवाद्यांनी सोमवारी भारताचे ३० जवान मारल्याचा दावा केला आहे. ‘चार पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सोमवारी अखनूरमध्ये केलेल्या हल्ल्यात ३० भारतीय जवानांना टिपण्यात आले. ही कारवाई म्हणजे लष्कर ए तोयबाकडून करण्यात आलेले सर्जिकल स्ट्राईक आहे,’ असे हाफिज सईदने म्हटले होते.