‘टाइम’ साप्ताहिकाची प्रभावशाली व्यक्तींची यादी

टाइम साप्ताहिकाच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पहिल्या शंभर जणांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांचा समावेश आहे. साप्ताहिकाने बुधवारी शंभर प्रभावशाली व्यक्तींची २०२१ या वर्षाची यादी जाहीर केली असून त्यात अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्षा कमला हॅरीस, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, ड्युक अ‍ॅण्ड डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी व मेघन तसेच माजी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तसेच तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर यांचा समावेश आहे.

‘टाइम’ने म्हटले आहे की, ममता बॅनर्जी यांच्या रूपाने भारतीय राजकारणातील एका निर्भीड महिला नेत्याचा चेहरा पुढे आला. ममता यांनी पक्षाचे नेतृत्व केले नाही तर त्या म्हणजेच पक्ष आहेत. रस्त्यावरची लढाई लढण्याची जिद्द व स्वकष्टाने मिळवलेले यश हे पुरुषी संस्कृतीला आव्हान देत उजळले आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांच्याविषयी म्हटले आहे की, चाळीस वर्षीय पूनावाला हे जगातील सर्वात मोठ्या लस निर्मात्या कंपनीचे नेतृत्व करीत असून त्यांनी अत्यंत योग्य वेळी जगाला मदत केली. करोनाची साथ संपलेली नाही, पण ती संपवण्यात पूनावाला नक्की मदत करतील. लस असमानता गंभीर असून जगातील काही देशांकडे जास्त लस आहे तर काही देशात लशीचा तुटवडा आहे.

टाइमच्या यादीत टेनिसपटू नाओमी ओसाका, रशियातील विरोधी नेते अलेक्झी नवाल्नी, संगीतकार ब्रिटनी स्पिअर्स, आशियन पॅसिफिक पॉलिसी अ‍ॅण्ड प्लानिंग कौन्सिलच्या कार्यकारी संचालक मंजुषा पी. कुलकर्णी, अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक, जागतिक व्यापार संघटनेचे नेतृत्व करणारी पहिली कृष्णवर्णीय महिला नगोझी ओकोन्झो इवियला यांचा समावेश आहे.

‘मोदी यांनी देशाला धर्मनिरपेक्षतेकडून हिंदू राष्ट्रवादाकडे नेले’

टाइमने म्हटले आहे की, भारताला तीन नेत्यांनी दिशा दिली. त्यात जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे. नेहरू व गांधी यांच्यानंतर भारतीय राजकारणावर इतका प्रभाव कुणी पाडला नव्हता. सीएनएनचे पत्रकार फरीद झकेरिया यांनी मोदी यांच्याविषयी लिहिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘मोदी यांनी देशाला धर्मनिरपेक्षतेकडून हिंदू राष्ट्रवादाकडे नेले. भारतीय मुस्लीम अल्पसंख्याकांचे अधिकार कमी झाले. पत्रकारांना धमकावण्यात आले, अनेकांना तुरुंगात टाकण्यात आले.’