स्टॉकहोम : भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांनी अर्थशास्त्रातील संशोधनात मोठी कामगिरी केली असून यापूर्वी अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रात नोबेल मिळाले होते. बॅनर्जी यांचा जन्म मुंबईत १९६१ मध्ये झाला. त्यांना जागतिक दारिद्रय़ निर्मूलनासाठी प्रयोगात्मक दृष्टिकोन या विषयावर नोबेल मिळाले आहे. त्यांच्या पत्नी एस्तेर डफलो व अर्थशास्त्रज्ञ मायकेल क्रमेर यांनाही हा सन्मान त्यांच्या समवेत मिळाला.

बॅनर्जी हे ५८ वर्षांचे असून त्यांनी १९८८ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी केली. त्यांचे शिक्षण कोलकाता विद्यापीठ व दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून झाले.

२००३ मध्ये त्यांनी अब्दुल लतीफ जमील दारिद्रय़ निर्मूलन कृती प्रयोगशाळा सुरू केली. त्यात त्यांच्या फ्रेंच अमेरिकी पत्नी डफलो यांचाही समावेश आहे. दोघेही पती-पत्नी एमआयटीत प्राध्यापक आहेत.

बॅनर्जी हे ब्युरो फॉरदी रिसर्च इन इकॉनॉमिक अ‍ॅनॅलिसिस ऑफ डेव्हलमेंट या संस्थेचे माजी अध्यक्ष तर एनबीईआरचे संशोधन सहायक व सीईपीआरचे संशोधन फेलो आहेत. किएल इन्स्टिटय़ूटचे ते फेलो असून अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस, इकॉनोमेट्रिक सोसायटी या संस्थांचेही फेलो आहेत. त्यांना यापूर्वी इन्फोसिस पुरस्कार मिळाला होता.  पुअर इकॉनॉमिक्ससह त्यांनी चार पुस्तके लिहिली असून त्यांच्या पुस्तकाला गोल्डमन सॅश  पुरस्कार मिळाला होता.

त्यांनी तीन पुस्तकांचे संपादन केले असून दोन लघुपटांचे दिग्दर्शन केले आहे. संयुक्त राष्ट्र सरचिटणिसांच्या २०१५ नंतरच्या विकास कार्यक्रम निर्धारण समितीत त्यांचा समावेश होता.

जीवनमान उंचावण्याची ताकद दारिद्रय़ाच्या दुष्टचक्राबाबत प्रश्न

मोरोक्कोतील पुरेसे अन्न न मिळणारी व्यक्ती दूरचित्रवाणी संच का विकत घेते. गरीब भागातील मुलांना शाळेत जाऊनही  शिकणे दुरापास्त का होते. खूप मुले असल्याने तुम्ही खरोखर गरीब होता का, यासारख्या प्रश्नांची उत्तरे देणे हे जागतिक दारिद्रय़ाचे दुष्टचक्र भेदण्यासाठी गरजेचे आहे असे त्यांनी ‘पुअर इकॉनॉमिक्स’ या पुस्तकात म्हटले आहे..

जीवनमान उंचावण्याची ताकद

यंदा अभिजित बॅनर्जी, मायकेल क्रेमर व एस्तेर डफलो यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा दारिद्रय़ निर्मूलनावर उपाय सुचवण्याच्या कामगिरीसाठी देण्यात आला आहे. या तिघांनी  जागतिक  दारिद्रय़ाचा सामना करण्यासाठी प्रयोगाधिष्ठित दृष्टिकोन मांडला. त्यातून उदयास आलेली विकासात्मक अर्थशास्त्र ही शाखा आता विशेष लक्ष वेधून घेत आहे. गेली दोन दशके या तिघांनी यावर संशोधन केले असून दारिद्रय़ निर्मूलनाच्या क्षेत्रात बरेच यश येत असले तरी तो प्रश्न गंभीर आहे. अजूनही ७० कोटी लोकांचे उत्पन्न हे कमी आहे. ते दारिद्रय़ रेषेखाली मोडतात. दरवर्षी ५० लाख बालके वयाचे पाचवे वर्ष गाठण्याआधीच या जगाचा निरोप घेतात. हे मृत्यू आजार रोखून टाळता येऊ शकतात व त्यासाठी कमी खर्चाचे उपचार विकसित करणे आवश्यक आहे. जगातील निम्मी मुले अजून मूलभूत साक्षरता व आकडेमोडीच्या ज्ञानापासून दूर आहेत, ते अर्ध्यावर शाळा सोडतात. या प्रश्नांवर विश्वासार्ह उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या तिघा विजेत्यांनी केला आहे.  दारिद्रय़ाचा मुकाबला करण्याचा चांगला मार्ग कुठला हे त्यांनी दाखवून दिले. समस्येचे विभाजन हे  लहान, व्यवस्थापन योग्य भागात करणे, त्यावर प्रश्न विचारून मग  मार्ग काढत जाणे ही त्यांची पद्धत आहे. शिक्षण व बालमृत्यू समस्यात त्यांनी काही प्रयोग करून ते टाळण्याचे मार्ग प्रशस्त केले. १९९० च्या मध्यावधीत मायकेल क्रेमर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा दृष्टिकोन कसा उपयोगी आहे दाखवून देताना पश्चिम केनियात शाळांचे निकाल सुधारण्यासाठी काही धोरणात्मक  हस्तक्षेपांची फलनिष्पत्ती दाखवून दिली.  अभिजित बॅनर्जी, एस्तेर डफलो व मायकेल क्रेमर यांनी अशाच पद्धतीने अभ्यास करून इतर प्रश्नांचा विविध देशांमध्ये वेध घेतला.  त्यातून विकासात्मक अर्थशास्त्राचा उदय झाला. या संशोधकांच्या मार्गाने गेल्यास आपल्याला दारिद्रय़ निर्मूलनाच्या योजना अधिक प्रभावीपणे आखता येतील व त्यांचा परिणाम तपासता येईल.  लाखो लोकांचे दारिद्रय़ दूर करून त्यांचे जीवनमान उंचावण्याची ताकद या संशोधनात आहे.