News Flash

पोलीस ठाण्यातूनच दुबेला छाप्याची माहिती

अटकेतील साथीदाराचा गौप्यस्फोट

संग्रहित छायाचित्र

 

कानपूरमधील बिक्रू खेडय़ात विकास दुबे याच्या टोळीवर जो छापा टाकण्यात आला त्याची माहिती आधीच टोळीला मिळालेली होती, अशी माहिती या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दुबे याच्या टोळीतील साथीदाराने पोलिसांना दिली. या चकमकीत पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलिस ठार झाले होते. एका पोलिसानेच या छाप्याची माहिती दुबे टोळीला दिली होती असे आता स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी दयाशंकर अग्निहोत्री याने जाबजबाबात पोलिस छाप्याची पूर्वकल्पना मिळाल्याच्या गौप्यस्फोट केला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासानंतर दिलेल्या माहितीनुसार, अग्निहोत्री याने जाबजबाबात या चकमकीच्या संदर्भात काही तपशील पोलिसांना सांगितला. अग्निहोत्री याने पोलिसांना सांगितले, की विकास दुबे याला चौबेपूर पोलीस ठाण्यातून फोन आला होता. तीन पोलिस ठाण्यांचे पथक बिल्होरचे परिक्षेत्र अधिकारी देवेंद्र मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली दुबे याला अटक करण्यासाठी येत आहे, अशी माहिती  फोनद्वारे मिळाली होती. हा फोन एका पोलिसाने केला होता. मध्यरात्रीनंतर हा छापा पडणार असल्याचीही आगाऊ सूचना दुबे टोळीला मिळाली होती. जेव्हा पोलिस कानपूर देहातमधील बिक्रू खेडय़ात छापा टाकण्यासाठी आले तेव्हा दुबे याच्या समवेत त्याचे २५ साथीदार उपस्थित होते.

या प्रकरणी एका पोलिस उपनिरीक्षकावर संशय असल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे. चौबेपूर ठाण्याचे अधिकारी विनय तिवारी यांचे नऊ तास जाबजबाब घेण्यात आले. त्यांना निलंबित  करुन लखनऊला नेण्यात आले आहे. चौबेपूर हे ठिकाण बिक्रू येथून १४ कि.मी अंतरावर आहे. एका ग्रामस्थाने दुबे याच्याविरोधात खुनाची तक्रार केल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुबेच्या गुंडांनी त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिस पथकावर बेछूट गोळाबार केला होता. तो सुनियोजित कट होता हे स्पष्ट झाले.

अधिकाऱ्यांनी सांगितले, की अग्निहोत्री हा दुबेचा साथीदार असून तो पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाला असून त्याचे नाव प्राथमिक अहवालात आहे. शनिवारी रात्री जे पोलीस पथक दुबे याला पकडण्यास गेले होते त्यांच्यावर गोळीबार करण्यात अग्निहोत्री सामील होता.

दुबेची माहिती दिल्यास एक लाखाचे इनाम

पोलीस महानिरीक्षक अगरवाल यांनी सांगितले की, दुबे याचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास १ लाख रुपये इनाम दिले जाईल. निलंबित पोलीस अधिकारी तिवारी याला ताब्यात घेतले नसून त्याची चौकशी सुरू आहे. जर काही पुरावे आढळले तर त्याला अटक करण्यात येईल. दुबे याचे घर शनिवारी पाडून टाकल्याच्या कारवाईबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, दुबे याने घरात शस्त्रास्त्रे व दारुगोळा खंदकात  भरून ठेवला होता. शस्त्रास्त्रे शोधण्यासाठी भिंती तोडाव्या लागल्या त्यामुळे छप्पर कोसळले. तेथे मोठय़ा प्रमाणात दारुगोळा सापडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 12:14 am

Web Title: information about the vinay dubey raid from the police station itself abn 97
Next Stories
1 लसीच्या चाचण्यांसाठी ६ ते ९ महिन्यांचा अवधी
2 नेपाळच्या सत्तारूढ पक्षात फुटीचे संकेत
3 ट्रम्प यांचे स्वातंत्र्यदिनी विरोधकांवर टीकास्त्र
Just Now!
X