८.७ कोटी खातेदारांना न्यूजफीडमध्ये आजपासून माहिती चोरीचा तपशील मिळण्यास प्रारंभ

फेसबुकच्या ८७ दशलक्ष वापरकर्त्यांची कोणती माहिती केंब्रिज अ‍ॅनॅलिटिकाने घेतली, याचा तपशील आजपासून त्यांना न्यूजफीडमध्ये मिळण्यास सुरूवात होणार आहे. त्यांना त्यात सविस्तर संदेश मिळेल.

फेसबुकने म्हटले आहे, की अमेरिकेतील ७० दशलक्ष खातेदार यात असून इतर खातेदार हे फिलिपिन्स, इंडोनेशिया व ब्रिटनमधील आहेत.  ट्रम्प यांच्या प्रचारावेळी केंब्रिज अ‍ॅनॅलिटिकाने फेसबुक वापरकर्त्यांची माहिती घेऊन त्याचा वापर केला. त्यानंतर फेसबुकला बचावात्मक पवित्रा घेऊन माफी मागावी लागली होती. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी मोठी चूक झाल्याचे मान्य केले होते.

फेसबुकची जगाप्रति असलेली जबाबदारी काय आहे याचे भान सुटल्याचे त्यांनी सांगितले. या आठवडय़ात झकरबर्ग यांचे अमेरिकी काँग्रेसपुढे जाबजबाब होणार आहेत. केंब्रिज अ‍ॅनॅलिटिका प्रकरणात जागल्याच्या भूमिकेत असलेल्या ख्रिस्तोफर वायली यांनी सांगितले की, व्यक्तिमत्त्व प्रश्नमंजूषेत ५० दशलक्ष लोकांची माहिती गोळा करण्यात आली होती. ही संख्या खरेतर ८७ दशलक्ष असू शकते असेही त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

फेसबुक अ‍ॅप ‘धिस इज युवर डिजिटल लाइफ’ने २०१४ मध्ये ही प्रश्नमंजूषा घेतली होती, त्यात अ‍ॅलेक्झांडर कोगान या शिक्षण संशोधकाने २७०००० लोकांना पैसे देऊन माहिती विकत घेतली होती. त्यात संबंधित व्यक्तींच्या मित्रांची माहिती फेसबुकवरून घेण्यात आली. नंतर डाटा अ‍ॅपने माहिती घेण्यावर फेसबुकने मर्यादा आणल्या, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.

..म्हणून वोझ्नीअ‍ॅक यांनी फेसबुक सोडले

अ‍ॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह वोझ्नीअ‍ॅक यांनीही फेसबुक वापरकत्यरंची माहिती स्वत:च्या फायद्यासाठी गोळा करत असल्यामुळे सोडल्याचे स्पष्ट केले. तसेच अ‍ॅपल चांगल्या आणि दर्जेदार  वस्तूंची निर्मिती करून पैसे कमावते, अशा मार्गानी नाही, फेसबुक हे पण एक उत्पादित वस्तू आहे, असे सांगत झकरबर्गबाबत नाराजी व्यक्त केली.

सर्वच खातेदारांना सूचना येणार

एकूण २.२ अब्ज फेसबुक खातेदारांना आजपासून नोटीस येण्यास सुरूवात होईल, त्याचे नाव ‘प्रोटेक्टिंग युवर इनफॉर्मेशन’असे आहे. त्यात एक लिंक दिली जाईल त्यात कोणते अ‍ॅप्स ते वापरतात व कोणती माहिती त्यांनी शेअर केली याची माहिती दिली जाणार आहे. जर वापरकर्त्यांना वाटले तर त्यांनी संबंधित अ‍ॅप बंद करावीत किंवा त्रयस्थ अ‍ॅप प्रवेश बंद करावा. तो प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय राहील.

झकरबर्ग यांनी राजीनाम्याची शक्यता फेटाळली

वॉशिंग्टन : माहिती चोरीप्रकरणी फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांनी राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली. त्याऐवजी भारत, पाकिस्तान, अमेरिका या देशांतील निवडणुकांच्या संदर्भात तपास करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची घोषणा केली. अटलांटिक मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत झकरबर्ग यांनी स्पष्ट केले की, ते या प्रकरणी राजीनामा देणार नाहीत.