देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिस लिमिटेडने अमेरिकेतील आपल्या कर्मचाऱ्यांना विशेष विमानाने भारतात आणलं आहे. अमेरिकेतील 76 कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अशा 206 जणांना स्पेशल चार्टर्ड विमानाने कंपनीने भारतात आणलं.

भारतात परतलेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांचा व्हिसा संपला होता , तर काही जणांचा व्हिसा लवकरच संपणार होता. कंपनीने सॅन फ्रॅन्सिस्को इथून या कर्मचाऱ्यांना स्पेशल चार्टर्ड विमानाने बंगळुरूमध्ये आणलं. सोमवारी सकाळी हे विमान बंगळुरुत पोहोचलं.

“करोना व्हायरसने आपल्या जीवनावर विविधप्रकारे परिणाम केला आहे. काही इन्फोसिसचे कर्मचारी व्हिसा संपल्यामुळे अमेरिकेत अडकले होते. करोना महामारीमुळे सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद आहे. अशावेळेस अमेरिकेत अडकलेल्या आमच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा भारतात आणण्याचं आम्ही ठरवलं. 200 पेक्षा जास्त जणांना आणण्यासाठी आम्ही स्पेशल चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली, आता ही माहिती देताना विमान बंगळुरूमध्ये पोहोचलं आहे”, अशी पोस्ट कंपनीचे असोसिएट व्हीपी (associate vice-president)संजीव बोडे यांनी शेअर केली आहे.

दरम्यान, अडकलेल्या कर्मचाऱ्यांना परत आणण्यासाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था केल्यामुळे सोशल मीडियावर इन्फोसिस कंपनीच्या व्यवस्थापनाचं कौतुक होत आहे. एकीकडे इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना भारतात परत आणलं असलं तरी अमेरिकेत अद्याप एचसीएल टेक, विप्रो , टेक महिंद्रा अशा अनेक भारतीय आयटी कंपन्यांचे हजारो कर्मचारी अद्यापही अडकले आहेत.