देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसमधील गुंतवणुकदारांना एकाच सत्रात तब्बल ४५ हजार कोटी रुपये गमावावे लागले आहेत. बंगळुरूतील या कंपनीने अनैतिक मार्गाने मोठा नफा व महसूल मिळवल्याचा आरोप ‘इथिकल एम्प्लॉईज’ या कर्मचारी गटाकडून करण्यात आला आहे.

शेअर बाजारात इन्फोसिसचे भांडवली मूल्य शुक्रवारी तीन लाख २६ हजार ९३९ कोटी रुपये होते. ते आता दोन लाख ८१ हजार ८८३ कोटी रुपयापर्यंत घसरले आहे. इन्फोसिसच्या गुंतवणुकदारांमध्ये कंपनीबद्दल निर्माण झालेल्या नकारात्मक भावानांमुळे शेअरची मंगळवारी मोठ्या प्रमाणात विक्री झाली परिणामी शेअरचा भाव चांगलाच कोसळला. यामुळे गुंतवणुकदारांच्या शेअर्सचे मूल्य तब्बल ४५ हजार ५६ कोटी रूपयांनी कमी झाले आहेत. मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजारात इन्फोसिसच्या शेअरची १६ टक्क्यांनी घसरण झाली.

‘एनसई’मध्ये कंपनीच्या शेअरचा भाव १६ टक्क्यांनी घसरून तो ६४५ रुपये झाला. तर ‘बीएसई’ मध्ये देखील दिवसभरात शेअरची १६ टक्के घसरण झाल्याने प्रती शेअर मूल्य ६४९.३५ रूपये झाले. २६ नोव्हेंबर २०१८ रोजी इन्फोसिसच्या शेअरच्या भावाने ५२ आठवड्यातील ६००.६५ रुपये हा नीचांक बघितला होता. त्यापेक्षा आजचा इन्फोसिसचा शेअरचा भाव ७.४४ टक्के अधिक आहे.

दिवसाच्या सुरूवातीसच बीएसई आणि एनएसईमध्ये इन्फोसिसचा शेअर १० टक्क्यांनी घसरला. नंतर तो याच १० टक्क्यांच्या चौकटीत अडकून ७६ अंकांनी घसरत ६९१ रुपये झाला. आधीच्या सत्रात मुंबई शेअर बाजारात तो ७६७.७५ रुपयांवर बंद झाला होता. निफ्टीत इन्फोसिसचा शेअर १० टक्क्यांनी घसरून त्याचा भाव ६९१ रुपये झाला. आधीच्या सत्रात निफ्टीत तो ७६७.८५ रुपयांवर बंद झाला होता.